वि. वि. करमरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> मंगेश वरवडेकर

विविक गेले… नेहमीच बातमीचा पाठलाग करणारे एक वेडे पत्रकार आणि त्यांची धगधगती लेखणी कायमची शांत झाली. त्यांनी आपलं अवघं आयुष्य क्रीडा पत्रकारितेला वाहिलं, खेळाला वाहिलं, खेळाडूंच्या हितासाठी वाहिलं. जणू त्यांचं लग्नच पत्रकारितेशी झालं असावं. बातमीचा पाठलाग करताना हा माणूस कुणालाही भिडायचा. मग ती व्यक्ती कितीही वजनदार राजकारणी असो किंवा क्रीडा संघटक. ते निर्भीड होते. क्रीडा पत्रकारितेशीच लगीन लागल्यामुळे त्यांना त्याच्या पलीकडे कधी सुचलेच नाही. ते सदासर्वदा फक्त बातमीदारीच्याच प्रेमात असायचे. त्यामुळेच ते अविवाहित राहिले आणि त्यांनी आपलं सर्वस्व-आयुष्य क्रीडा पत्रकारितेला वाहिलं.

करमरकर हेसुद्धा हाडामांसाचेच होते. ते कोणत्या खेळात तज्ञ होते असेही नाही. त्यांना खेळाच्या तांत्रिक बाजूंची सर्व माहिती होती असेही नाही, पण कोणत्या खेळाची बातमी कशी लिहिली तर त्याचा जास्त परिणाम होईल याची त्यांना भलतीच जाण होती. त्यांच्या ठेवणीतल्या तिरकस शब्दांनी अनेकांना घायाळ केलेय, अनेक राज्यकर्त्यांना भानावर आणलेय. त्यांची लेखणी खेळ आणि खेळाच्या हितासाठीच झटायची, पण त्यांचं विशेष प्रेम होतं मराठमोळय़ा आणि देशी खेळांवर. मग तो खो-खो असो, कबड्डी असो किंवा कुस्ती असो. आपले खेळ मोठे झाले पाहिजेत, आपले खेळाडू मोठे झाले पाहिजेत, त्यांना चांगल्या नोकऱया मिळायला हव्यात हाच त्यांचा ध्यास होता, पण असं करताना त्यांनी संघटकांना, आयोजकांना नेहमीच पाण्यात पाहिलं हे विसरून चालणार नाही. दुसरीकडे त्यांनी देशी खेळांना-खेळाडूंना आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रात दिलेल्या प्रसिद्धीमुळे त्यांचं आयुष्य बदलल्याचे सांगणारेही असंख्य आहेत.

निधडय़ा करमरकरांनी आपल्या लेखणीने अनेक मित्र जमवले तसेच अनेक दुश्मनही तयार झाले. त्यांच्यात एक जबरदस्त गुण होता. या अवलियाच्या लेखणीत प्रचंड ताकद होती. शैलीत अद्भुत क्षमता होती. ते कोणत्याही खेळाच्या संघटनेला वा संघटकाला एका लेखात हलवू शकत होते. त्यांच्या शोधपत्रकारितेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. 1982 साली दिल्लीतील आशियाई स्पर्धेपूर्वी लिहिलेले सदर भलतेच गाजले. त्यांच्या ‘ना खंत ना खेद’ या सदरानेही अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले होते, पण त्यांची लेखणी एखाद्या हुकूमशहासारखीच वागली. त्यांच्या चष्म्यातून जे दिसेल तेच खरे, त्यांना जे वाटेल तेच योग्य. त्यांचं काही चुकलंय हे सांगण्याचं धाडस कुणातही नव्हतं, ना कुणालाही जमलं, पण एखाद्याने ते दाखवलंच तर त्याची काही खैर नसायची. त्यामुळे त्यांच्या वाटय़ाला कुणीही गेला नाही.

लेखणीबरोबरच करमरकर समालोचनातही चांगले रमले. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून अनेक खेळांचे धावते समालोचन केले. क्रिकेटचे समालोचन तर कानांना मंत्रमुग्ध करणारे आणि खेळाची समग्र माहिती देणारे असायचे. हे करताना त्यांनी अनेक नव्या शब्दांनाही जन्म दिला. त्यांचे ‘चौकार’, ‘षटकार’ असे काही शब्द भन्नाट होते, तर त्यांचे काही शब्द लोकांना पटले नाहीत. म्हणून ते त्यांनी बदलले असे नाही. त्यांचं नेहमीच म्हणणं होतं की, पत्रकार कधीच निवृत्त होत नाही. त्यामुळे त्यांनी नियमानुसार वयाच्या निवृत्तीनंतरही आपली शोधपत्रकारिता, आयोजक-संयोजकांना सोलून काढणारी पत्रकारिता कायम ठेवली. करमरकरांनी केलेल्या संघर्षामुळे मराठी क्रीडा जगताला वर्तमानपत्रात हक्काचे क्रीडा पान लाभले. त्या पानावरून केलेली शोधपत्रकारिता आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. करमरकरांच्या अभ्यासपूर्ण लेखांमुळे मराठी क्रीडा जगताला अनेक एकलव्य गवसले, पण करमरकर कधी अर्जुन घडवू शकले नाहीत. त्यांच्यासाठी श्रमिक पत्रकार म्हणजे जीव की प्राणच! त्यामुळे अर्धवेळ काम करणाऱया पत्रकारांना ते कधीही आपलेसे करू शकले नाहीत.

असो, बातमीचा नेहमीच चोहोबाजूंनी विचार करणाऱया करमरकरांनी क्रीडा पत्रकारितेत परिणामकारक बातमी कशी असावी, कमी शब्दांत चिमटे कसे काढावेत, आयोजकांना घाम कसा फोडावा, खेळाच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱया राज्यकर्त्यांची कशी पोलखोल करावी याचे बाळकडू सर्वप्रथम त्यांनीच पाजलेय. याच बाळकडूवर आजची क्रीडा पत्रकारिता वाढलीय, पण आज त्या पत्रकारितेत करमरकर नाहीत. त्यामुळे करमरकरांची आठवण क्षणाक्षणाला येणार. ते शरीराने गेलेत, पण त्यांचे लिखाण अमर आहे!