उमेद – निर्भिड सेनाधुरंधर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विनायक अभ्यंकर

हिंदुस्थानी सैन्याचे ते पहिले कार्यरत फिल्ड मार्शल सॅम बहाद्दूर यांनी चौऱ्याहत्तर वर्षे देशसेवा केली. हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये फाळणीच्या काळात सैन्य वाटणीच्या वेळेला सॅम बहाद्दुरांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. बांगलादेश युद्धातील त्यांचे डावपेच, युद्धनीती व अचूक नेतृत्व यांच्या कथा आजही सांगितल्या जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त हा आठवणींचा उजाळा.

डेहराडूनच्या लष्करी प्रबोधिनीच्या प्रवेशद्वारापाशी एक तरुण लष्करी अधिकारी सामानासह उतरताच त्याला समोर एक व्यक्ती दिसली. त्याने मजुरी देण्याच्या बोलीवर ते सामान ऑफिसर्स ब्लॉकपर्यंत नेण्यासाठी मदत करण्यास त्या व्यक्तीस सांगताच त्या माणसाने उचलून सामानासकट तो माणूस त्या तरुणामागे चालू लागला. अपेक्षित ठिकाणी पोहोचताच त्या तरुणाने त्या ‘मजुरा’स मजुरी देऊन पृच्छा केली, ‘‘तुझे नाव काय?’’ मजुराने ‘‘या देहास सॅम बहाद्दूर माणेकशॉ म्हणतात’’ असे म्हणताच त्या तरुणाने सामान फेकून लष्करी ‘सॅल्यूट’ ठोकला व अपराधी चेहऱ्याने खजील झाला. फिल्ड मार्शल माणेकशॉ मजुरी त्याच्या हातात ठेवत म्हणाले, ‘‘रिलॅक्स माय बॉय, यू विल एन्जॉय, स्टे हीअर’’ असे म्हणत त्याच्या पाठीवर हात फिरवला.

इतका खिलाडूपणा व आपल्या सहकाऱ्यांना पितृवत वागवणारे फिल्ड मार्शल सॅम हे हृदयातून जितके दयाळू, निर्मळ होते, तितकेच आपल्या कर्तव्याबद्दल कठोर होते. जे पटते, मनापासून वाटते ते कोणतीही भीडभाड न ठेवता मांडत. प्रसंग आहे एप्रिल 1971 मधला.

दिवंगत पंतप्रधान इंदिराजींनी एक महत्त्वाची तातडीची बैठक बोलावली होती. सरदार स्वर्णसिंग, बाबू जगजीवन राम व यशवंतराव चव्हाण बैठकीस उपस्थित होते. जनरल सॅम बहाद्दूर यांना बैठकीत पाचारण होताच क्रुद्ध झालेल्या इंदिराजी जोरात खेकसल्या, ‘‘सैन्य युद्ध का करत नाही? (I want you to march in). जनरल माणेकशॉ, ‘‘नाही, आता युद्ध शक्य नाही.’’ यशवंतराव, ‘‘जनरल, का शक्य नाही?’’ जनरल सॅम बहाद्दूर, ‘‘मी टँक जास्त हवेत हे कित्येक दिवस म्हणतोय, पण आम्हाला निधीच मिळत नाही.’’ अर्थमंत्री यशवंतराव व इतर वरिष्ठ मंत्री चपापले, गप्प झाले.

युद्ध का लढता येणार नाही हे ‘निर्भीडपणे’ जनरल माणेकशॉ यांनी इंदिराजींना सांगितले, ‘‘आपण माझा राजीनामा मागू शकता, पण मी आपणांस शब्द देतो, युद्ध झालेच तर मी व माझी मुले जिंकूनच दाखवू.’’ इंदिराजींनी इतरांना रजा दिली आणि जनरल सॅमना बसवून समजून घेतले. सीमेवर मेपर्यंत दहा लाख निर्वासित गोळा झाल्याने परिस्थिती उग्र व गंभीर होत असतानाच हा प्रसंग. निर्भीडपणे काही आडपडदा न ठेवता जनरल माणेकशॉंनी इंदिराजींना आश्वासन दिले व ते पूर्ण केले.

अमृतसर या पवित्र भूमीत सॅम बहाद्दूर यांचा जन्म एका सधन कुटुंबात 3 एप्रिल 1914 या दिवशी झाला. त्यांचे पिताजी हे एक उच्चप्रतिष्ठत सरकारी अधिकारी होते. वडिलांची इच्छा होती, सॅमने डॉक्टर व्हावे, परंतु ब्रिटिशांनी पिंग कमिशन जाहीर करताच सॅम परीक्षा पास करत लष्करी अॅकॅडमीच्या पहिल्या बॅचमध्ये दाखल होऊन लष्करी अधिकारी झाले.

दुसऱ्या महायुद्धात तत्कालीन 4/12 प्रंटीयर रॉयल फोर्समध्ये दाखल होताच बर्मा प्रंटवर त्यांनी पराक्रम केला. तेव्हा ब्रिटिश जनरल डी.टी. कोवन बेशुद्ध पडलेल्या सॅमच्या छातीवर स्वतःचे मिलिटरी क्रॉस चढवत म्हणाले, ‘‘He faught as a tiger.’’ 1934 मध्ये सैन्यात दाखल झालेले सॅम बहाद्दूर यांनी चौऱ्याहत्तर वर्षे देशसेवा केली. फिल्ड मार्शल हा आजन्म सेवारत असतो. सॅम सोहराबजी होमजी फ्रेमजी माणेकशॉ यांचे स्वर्गारोहण 27 जून 2008 रोजी झाले. हिंदुस्थानी सैन्याचे ते पहिले कार्यरत फिल्ड मार्शल होते. भूदल सैन्याचा फिल्ड मार्शल हा मृत्यूपर्यंत निवृत्त होत नसतो. 1934 साली सैन्यात दाखल झालेले सॅम बहाद्दूर लौकिक अर्थाने ‘निवृत’ झाले 2008 साली.
बांगलादेश युद्धातील त्यांचे डावपेच, युद्धनीती व नेतृत्व इतके अचूक होते की, 4 डिसेंबरला सुरू झालेले ते युद्ध संपले 12 डिसेंबरला म्हणजे मेजर जनरल गंधर्वसिंग ढाक्याच्या वेशीवर पोहोचून ए. ए. नियाजीला शरण येण्याचे सुनवत होते. चार दिवस शरणागतीचे सोपस्कार ठरवण्यात गेले. शेवटी सॅम बहाद्दूरने जनरल नियाजींना निर्वाणीचा संदेश धाडला, ‘‘शरण या. अन्यथा हकनाक मराल.’’

इंदिराजी त्यांना चांगल्या ओळखत होत्या. हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये फाळणीच्या काळात सैन्य वाटणीच्या वेळेला सॅम बहाद्दुरांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. सॅम बहाद्दूर नेहमी म्हणत, ‘‘मी मृत्यूला भीत नाही म्हणणारा माणूस एकतर खोटे बोलत असतो नाहीतर निश्चितच तो गुरखा सैनिक असतो.’’ गुरखा रेजिमेंटवर त्यांचा इतका दुर्दम्य विश्वास होता.

माझ्या सैनिकी मनाला आनंदमिश्रित आश्चर्य वाटते. अत्यंत अल्पसंख्याक असणारी पारशी जमात, पण ही हिंदुस्थानी समाजात विरघळून गेलेली असली तरी स्वतःचे वेगळेपण जपत हिंदुस्थानची मनापासून सेवा करते आहे. पुण्याचे परमवीरचक्र विजेते कर्नल अर्देशीर तारापोर हे 17 पूना हॉर्स पॅव्हेलरीचे असेच लढवय्ये. या पारशी समुदायाने हिंदुस्थानी विविधरंगी संस्कृतीत आपला एकतेचा रंग भरला आहे. फिल्ड मार्शल सॅम बहाद्दूर – यह नाम ही काफी है. पाकिस्तानला नाक घासायला लावणारा सेनानायक, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना दीर्घ सलाम!
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत)