अनुबंध – आला मृग आला आला मृद्गंध आला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रकाश रामचंद्र क्षीरसागर  

जूनच्या पहिल्या आठवडय़ात मृग नक्षत्राचा पाऊस सुरू होईल. या मृगागमनाचे स्वागत करणारा हा लेख. मृगाच्या थेंबांनी पुलकित झालेल्या धरतीचे स्तवन शब्दांतून करण्याचा प्रयत्न…

सृष्टीचे कौतुक जाण बाळा। मग नेमेचि येतो पावसाळा।।

ही कविता काही पिढय़ांनी अभ्यासली. त्या वेळी नेमेचि पावसाळा येत असे. त्या पावसाळ्याचे वर्णन नेमेचि म्हणजे नेमाने आणि नियमित येणारा पाऊस… त्यानंतर सृष्टीचे नयनरम्य दर्शन नेत्रांना सुखावणारे असते. सर्वत्र प्रसन्न वातावरण, हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणाच्या मखमालीचे असेच सर्वत्र वातावरण दिसते. चैत्र-वैशाख हे महिने पृथ्वीची काहिली काहिली होत असते. सर्वत्र रणरण असते. नेत्रांची जळजळ होत असते. सर्व शरीर तप्त असते. सृष्टीतील सर्व प्राणिमात्र अत्यंत त्रस्त झालेले असतात. सर्वांना तृष्णा सतावीत असते. हा उन्हाळा आता संपू दे आणि नवचैतन्य लाभू दे अशी प्रार्थना निसर्गातील सर्व प्राणिमात्र मनातून करीत असतात. सृष्टी वरुणराजाची करुणा भाकत असते. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हावर हा उतारा असतो. त्या पावसाच्या शिडकाव्याने जमीन शांत शांत होते.

मे महिन्यात शेतकरी शेतीच्या मशागतीस सुरुवात करतो. आगामी हंगामाच्या पेरणीचे वेध शेतकऱयाला लागतात. रानातील ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करून घ्यायची. नांगराने ढेकळे फोडली की मग जमीन समतल होते. कुळव घालून ती खालची जमीन वर येते आणि नंतर ही जमीन सुपीक होते. ही जमीन आता तप्त झाली तिला शांत करायला वळिवाने हजेरी लावलेली असते. वळीव जमिनीला अभिषेक करतो…

धरणीस ऊब लाभे पहिल्याच पावसाची 

होते कितीक तगमग मातीतल्या बिजाची 

मार्च आणि एप्रिल हे शेतीचे आणि सृष्टीचे मशागतीचे दिवस. शेतकरी या दिवसात शेतीची नांगरणी आणि कुळवणी करतात. गवत आणि काशा (तृणाची मुळे) वेचून त्याचे ढीग करतात आणि त्या वाळल्यावर पेटवून त्याची राख करतात. परंतु गवताची मुळे अतिशय चिकट. त्यातही दुर्वा आणि इतर कुठलेही गवत पूर्णपणे नष्ट होत नाही. या गवताची पाती आणि मुळासकट उपटून टाकले तरीदेखील ही मुळे जमिनीत तग धरून असतात अगदी नांगरून काढून टाकली तरीदेखील. अनेकदा त्या गवताचे आणि आपण लावलेल्या धान्याचे चुकार बीज जमिनीत गच्च रुजून बसलेले असते. गवताला अगदी जणू अमरत्वाचे वरदान असते.

मृग आणि मृद् हे एकमेकांशी निगडित शब्द आहेत. रोहणी नक्षत्राचा पाऊस पडेलच हे निश्चित नसते. तो कधी बरसतो तर कधी रुसतो. परंतु जमिनीला आणि शेतकऱयाला मृगाची आशा आणि आस लागून राहिलेली असते. कोणत्याही  नक्षत्रातील पावसाची बात काही औरच असते. परंतु मृगाचा पाऊस हा सृष्टीसाठी एक सोहळाच असतो. या सोहळ्यासाठी वृक्ष, लता, भुईत रुतून बसलेले गवत अगदी आतूर झालेले असते. त्या सर्वांना मृगाची ओढ लागलेली असते. आपण कितीही पाणी घातले आणि ते अगदी वेळेवर घातले तरी त्यामुळे थोडा वेळ झाडे, वेली यांना तरतरी आल्यासारखे वाटते परंतु त्यांना खरा तजेला पावसाच्या पाण्यानेच येतो. मग तो अगदी चार थेंबांचा शिडकावा का असेना. त्या चार थेंबाने सुस्नात झालेली झाडे अगदी नव्या नवरीसारखी आनंदित दिसतात (आजकालच्या नव्या नवरीला ते अप्रूप असेलच असे नाही). त्या नवसंजीवनी देणाऱया पावसाची प्रतीक्षा सारी सृष्टी डोळ्यात प्राण आणून करीत असते. उन्हाळ्यात झाडे-वेलींवर आणि सर्वत्र धूळ पसरलेली असते. या पावसाने झाडे-वेलींचे स्नान होऊन ती अतिशय तजेलदार दिसतात. अगदी मेकअप केलेल्या नवयौवनेप्रमाणे. या पावसाने प्रफुल्लित झालेल्या धरतीवरील वेलींवर मग कळ्या उमलू लागतात. नव्या बीजांचे अंकुरण होऊन पहिला मृगाचा शिडकावा पडता क्षणीच या अंकुराला सिंचन होऊन त्याची भुईतून बाहेर येण्याची धडपड सुरू होते. हा अंकुर किंवा कोंब लवलव करीत डुलत डुलत धरतीला आनंद देतो. त्याने आपले उदर फोडून या जगात प्रवेश केला आहे, त्या यातना व वेदना भुई त्या वेळी विसरते व अंकुराचे आगमन स्त्रीला नवजात शिशूचे मुख पाहिल्यावर जितका आनंद देते तितकाच आनंद भुईला या अंकुराच्या आगमनाने होतो. हा अंकुर जसजसा वाढतो तसतसा भुई सगळ्या वेदना विसरून या नवजात शिशूच्या वर्धनाचे कौतुक पाहत असते. अर्थात पाऊस हा या बीजाचा पिता असतो. मग ते शेतकऱयाने पेरलेले बीज असो व निसर्गाने भुईच्या पोटात सुरक्षित ठेवलेले गवताचे बीज असो… हे वळीव, अवकाळी आणि रोहिणीच्या पावसाने भुईच्या पोटात बाळसे धरू लागते.

उष्णता शमवून मृगाचा प्रेमवर्षाव मातीलाही भुलवतो. त्याचा गंध सृष्टीला धुंद करतो. त्या गंधाने माती पुलकित होते. हा गंध किती तऱहांनी बहरून येतो आणि तन मन बहरून येते. सृष्टीला नवसंजीवनी देणारा हा मृग किती तरल आणि तलम असतो ते या कोवळ्या कोंबांना विचारावे. त्यांच्या सळसळीतून हा मृदगंध मन ताजेतवाने करतो. कितीही भावनाविहीन माणूस असला तरी मृद् गंधाने पाघळतो. अगदी मातीप्रमाणे त्याची मतीही भुसभुशीत होते. त्यातून नवसृजनाचे कोंब या कवीमनालाही फुटत असतात… म्हणून कोणी उपहासाने म्हणतातदेखील, पाऊस आला आता कवितेच्या कोंबाला पालवी फुटेल.

पाऊस आणि कवीचेदेखील असेच अतूट नाते असते. पावसाची कविता होते आणि कवितेचा पाऊस बरसू लागतो. म्हणूनच कवितेलाही धुमारे या मृगाच्या शिडकाव्याने फुटत असावेत. मनाला बहर आणणारा हा मृगाचा पाऊस कधी बरसतो आणि पृथ्वी शांत शांत होते हे कळतच नाही. म्हणूनच पावसाच्या आगमनाची सगळी धरित्री वाटच पाहत असते. ग्रीष्माचा तडाखा सोसून सृष्टीची पाठ सोलून निघालेली असते. तिच्यावर मृग जणू मृद्गंधाचे मलम लावतो आणि तिला शीतलता देतो. मातीचा दाह मृगाच्या शिडकाव्याने थंड होतो. सृष्टीची लाहीलाही समाप्त होऊन तिच्या आनंदालाही फुटवे फुटू लागतात. गवतफुलांना नवा बहर येतो. सगळीकडे मृगागमनानंतर हिरवी, पिवळी, जांभळी गवतफुले नाचताना दिसू लागतात. सृष्टीचे खडतरपण संपून एक नव्हाळी सर्वत्र दिसू लागते. हा सृजनोत्सव मृगाच्या सिंचनानेच खुलून येत असतो. सृष्टीला नवसंजीवन देत असतो. हा मृगाचा महिमा वर्णावा तितका थोडाच आहे. हा मृग जणू पर्जन्यराजाच असतो. पावसाचा पहिला बेटा असणारा मृग आपल्या मृदू पावलांनी दुडुदुडू धावत पृथ्वीला बिलगतो आणि मग धराही थरथरते आनंदाने, नव्याच्या आगमनाने तेव्हा निसर्गात नवबीजाचे अंकुर जन्माला येत असतात.

n [email protected]