वेब न्यूज – डॉक्टर AI

>> स्पायडरमॅन

AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शोध लागल्यापासून या तंत्रज्ञानाने संपूर्ण जगाला थक्क करून सोडले आहे. सर्वच क्षेत्रात शिरकाव केलेल्या ह्या तंत्रज्ञानाने आपल्या कामगिरीने मानवी जीवन अत्यंत सुसह्य करून सोडले आहे. एका बाजूला संपूर्ण जगाचे भविष्य म्हणून बघितले जाणारे हे तंत्रज्ञान पुढे जाऊन जगासाठी धोक्याचे ठरणार असल्याचे भीतीदेखील अनेक संशोधक व्यक्त करत असतात. शक्यतो या तंत्रज्ञानाचा वापर कोणताही सल्ला घेण्यासाठी करू नये असादेखील ते आग्रह करतात. मात्र आता याच तंत्रज्ञानाने चक्क एका माणसाचा जीव वाचवला आहे आणि ही घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका 46 वर्षांच्या पुरुषाने आपला अनुभव कथन केला आहे. या इसमाला अचानक पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला. ताप अथवा पोट कडक होणे अशी कोणतीही लक्षणे दिसत नव्हती, पण तो उभादेखील राहू शकत नव्हता एवढय़ा तीव्र वेदना त्याला होत होत्या. अखेर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला पित्त झाल्याचे निदान केले आणि औषध देऊन परत पाठवले. या औषधानेदेखील काहीही फरक न पडल्याने अखेर या इसमाने xAI पंपनीच्या Grok AI चा सल्ला घेण्याचे ठरवले. त्याने आपल्या पोटदुखीची सर्व लक्षणे आणि होत असलेल्या त्रासाचे वर्णन करून सल्ला मागितला.

त्याने दिलेल्या माहितीचा अभ्यास करून Grok AI ने त्याला ही साधी लक्षणे नसून अपेंडिक्सची लक्षणे असल्याचे व बहुदा तो फुटणार असल्याचे सांगितले आणि त्वरित दवाखाना गाठण्याचा सल्ला दिला. त्याचा सल्ला ऐकून सदर इसमाने सरळ दुसरा दवाखाना गाठला. मात्र तिथे त्याने आपण AI च्या सल्ल्याने न आल्याचे सांगता, आपल्या नर्स बहिणीने सल्ला दिल्याने इथे आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे Grok AI चा सल्ला तंतोतंत योग्य ठरला आणि त्या इसमाची त्वरित सर्जरीदेखील करावी लागली. त्याचा जीव वाचल्याचा आनंद आहे, मात्र मानसिक अथवा शारीरिक, कोणत्याही आजारावर AI सल्ला घेणे टाळा, असे अनेक तज्ञांनी पुन्हा नमूद केले आहे.