साय-फाय -आर्टिफिशल इंटेलिजन्सचा शिक्षण क्षेत्राला विळखा

प्रसाद ताम्हणकर

शिक्षण क्षेत्राला जगभरात एक पवित्र क्षेत्र म्हणून पाहिले जाते. विद्यादानाचे हे कार्य अविरतपणे करत राहणाऱया शिक्षकांनादेखील आपल्याकडे वंदनीय मानले जाते. ’गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम।।’ अशा शब्दांत त्यांचा सन्मान केला जातो. मात्र ज्ञानदानाचे अमूल्य कार्य करणारा हा शिक्षक वर्ग सध्या चांगलाच चिंतेत पडलेला आहे आणि त्याला कारण आहे उदयाला आलेले नवे आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात AI तंत्रज्ञान होय.

सध्या जगभरातील विद्यार्थ्यांकडून या AI तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढला असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक वर्ग आणि शिक्षण तज्ञ प्रचंड चिंतेत पडलेले आहेत. अगदी पाचवीतले विद्यार्थीदेखील या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अवघ्या काही मिनिटांत विनाकष्ट घरचा अभ्यास पूर्ण करत आहेत. AI तंत्रज्ञानाला एखादा विषय फक्त सांगितला की, तो अवघ्या काही सेकंदांत त्या विषयावर तुम्हाला एक पूर्ण निबंध लिहून देऊ शकतो. एखादा गणिताचा फॉर्म्युलादेखील सोडवून देतो. तंत्रज्ञानाच्या याच सोयीचा खुबीने वापर करत अनेक विद्यार्थी स्वत: कुठलाही अभ्यास वा प्रयत्न न करता आपला अभ्यापाम पूर्ण करत आहेत.

एका बाजूला AI च्या मदतीने अवघड वाटणारे गणिताचे फॉर्म्युले शिकणारे, संगीत, चित्रकला, विविध भाषा यांचे ज्ञान घेणारे विद्यार्थी आहेत, तर दुसऱया बाजूला AI च्या मदतीने अभ्यासात आणि आता तर परीक्षेतदेखील घोटाळे करणारे विद्यार्थी सापडत आहेत. गेल्याच लेखात आपण उत्तर प्रदेश पोलिसांनी AI तंत्रज्ञानाची मदत घेऊन परीक्षेत फसवणूक करणाऱया परीक्षार्थींना कसे पकडले हे वाचले. आता चक्क ब्रिटनसारख्या देशात 400 विद्यार्थ्यांना अशाच प्रकरणात पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये LCE, UCL आणि रसेल ग्रुपच्या ग्लासगो विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांचा समावेश आहे. एकूण 400 विद्यार्थ्यांची फसवणूक प्रकरणात चौकशी करण्यात आली. संपूर्ण यूकेमधील विद्यापीठांमधील 377 विद्यार्थी

चॅटजीपीटी वापरून त्यांच्या अभ्यापामांमध्ये फसवणूक करताना पकडले गेले आहेत. त्यापैकी किमान 146 जणांना आधीच दोषी ठरवण्यात आले आहे, तर अनेक विद्यापीठांमध्ये इतर विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर, विशेषत AI चॅट बॉट्सच्या वापरामध्ये 2023 च्या सुरुवातीपासून लक्षणीय वाढ झाली आहे. आता हे चॅटजीपीटीसारखे बॉट्स अगदी सहज आणि मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून त्याचा प्रचंड वापर केला जात आहे. या AI बॉट्सच्या मदतीने कोणत्याही विषयावर काही मिनिटांत लेख किंवा निबंध लिहिता येतात. विद्यार्थ्यांना त्याच्या वापरापासून कसे रोखावे हे संकट विद्यापीठांसमोर निर्माण झाले आहे. यूकेमधील जवळपास सर्व विद्यापीठे अशा फसवणुकीच्या समस्येचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत, नवे मार्ग शोधत आहेत, परंतु हे तंत्रज्ञान नवीन असल्याने त्याचा अभ्यास करून त्याचा सामना करण्यासाठी काहीसा वेळ लागत आहे. अर्थात, काही शिक्षक आणि तज्ञांच्या मतानुसार AI सारखे तंत्रज्ञान हे इंटरनेटवर उपलब्ध असलेला मजकूर, सोर्सेस वापरून स्वत:चे लिखाण करते. त्यामुळे त्या लिखाणात मौलिकता वा स्वत:चा अनुभव किंवा निष्कर्ष नसतात. जर एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या भाषाशैलीशी परिचित असेल तर तो अशी चोरी ताबडतोब पकडू शकतो.

सध्या काही विद्यापीठांतर्फे अशी लेखनचोरी पकडण्यासाठी अॅण्टिप्लेगरिझ्म सॉफ्टवेअर टर्निटिनचा (turnitin) वापर या वर्षीच्या सुरुवातीपासून करण्यास सुरुवात झाली आहे. AI तंत्रज्ञानाद्वारे केलेले लिखाण ओळखण्यास हे सॉफ्टवेअर खूप उपयोगी पडेल असा अंदाज लावला जात आहे. मात्र अनेक तज्ञ व शिक्षक याच्या प्रभावी कामगिरीबद्दल अजूनही साशंक आहेत. सध्या घडत असलेल्या या घटना बघता हिंदुस्थान सरकारने वेळीच सावध होऊन शिक्षण क्षेत्रासाठी सुरक्षेच्या उपाययोजना लवकरात लवकर शोधून त्यांची अंमलबजावणी करायला हवी आहे. शिक्षकांच्या जोडीने पालकांनीदेखील आपला पाल्य AI च्या घातक विळख्यात अडकणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

[email protected]