
नृत्य कलाकार विशाखा काळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. कोरोनाच्या काळात उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तिच्या पश्चात दिव्यांग आई-वडील तसेच लहान बहीण प्रियांका काळे असा परिवार आहे.
‘महाराष्ट्राची गौरव गाथा’, ‘गर्जा’ यासारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये विशाखा काळे यांनी भूमिका बजाविली होती. तर ‘जिजाऊ’ या मालिकेतदेखील विशाखाने एक छोटी भूमिका केली होती. पण गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे तिच्याकडे कोणतेही काम नव्हते. गेल्या काही दिवसांपासून विशाखा प्रचंड तणावाखाली होती. त्यामुळेच तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल अधिक माहिती देताना विशाखाची बहीण प्रियंका काळे म्हणाली की, मंगळवारी नेहमीप्रमाणे तिने मला चहा दिला आणि वस्तूंची खरेदी करण्यास मी बाहेर गेले. घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. वर्षभरापूर्कीच विशाखाचा एक अपघात झाला होता. त्यात चेहऱ्य़ाच्या शस्त्रक्रियेसाठी लाख रुपयांचा खर्च आला होता. तेव्हा जवळचे पैसे संपले. नंतर कोरोनामुळे उत्पन्न थांबले. कार्यक्रम बंद झाल्यामुळे घराचे भाडे कसे द्यायचे, विशाखा या तणावात होती,’ असे प्रियांका हिने सांगितले.

























































