
>> अरुण घाडीगावकर
15 ऑगस्ट 1972 रोजी हिंदुस्थान आपल्या स्वातंत्र्याचा ‘रौप्य महोत्सव’ साजरा करीत असतानाच एका कलावंतानं रंगभूमीवर दमदार पदार्पण केलं होतं. नाटक होतं ‘महाराष्ट्राची दौलत’. स्थळ होतं दामोदर हॉल, परळ. अभ्युदयनगर, काळाचौकीमधील एका नाटय़संस्थेद्वारा त्याचा फ्रयोग झाला होता. त्याचं दिग्दर्शन केलं होतं शांताराम देसाई यांनी. त्या कलावंतामधील ‘स्पार्क’ देसाईंनी हेरला आणि त्याच्यातील उत्तम अभिनेता कोरून काढला. त्याचं पाठांतर खणखणीत. इतकं की, त्याचं ते संपूर्ण नाटकच मुखोद्गत होतं. अभिनयाची समजही उत्तम. त्याच्या याच गुणांना देसाईंनी पैलू पाडले. ‘महाराष्ट्राची दौलत’ या नाटकातील नायकाच्या-धनाजीच्या-भूमिकेनं मोहन साटम नावाचा एक अस्सल कलावंत लाभला. या कलावंताला रंगभूमीनं जपलं आणि त्याच्या पदरात त्याच्या वकुबाला साजेशा भूमिकांचं दान सतत टाकलं. नावातच मोह नसणारा हा कलावंत लौकिक मोहांना दूर सारत, मंतरलेल्या फळ्यांचा मोह मात्र सोडू शकला नाही. मोहन आणि रंगभूमी हे द्वैत, अद्वैत कधी झालं ते त्यांनाही उमगलं नाही.
फ्रारंभीच्या काळात महापालिका आंतरविभागीय खात्यांतर्गत नाटय़स्पर्धेसाठी महापालिका मुद्रणालयातर्फे काही वर्षे भाग घेतल्यानंतर एका वर्षी ‘बेबंदशाही’ हे ऐतिहासिक नाटक दिग्दर्शित केलं. मोहन साटम यांना ‘संभाजी’च्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला. याच नाटकानं मोहन साटम यांना व्यावसायिक रंगभूमीचा पडदा उघडून दिला. ‘ताराचंद्र थिएटर’तर्फे ‘बेबंदशाही’चे व्यावसायिक फ्रयोग होत, त्यात मोहन साटम हे राजाराम आणि मुकर्रब खान अशा दोन भूमिका करीत. दांडग्या स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी या नाटकातील शिपायाच्या भूमिकेपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेपर्यंत एकूण दहा भूमिका केल्या.
मोहन साटम यांचा स्वभाव निरपेक्ष मदत करण्याचा. नाटय़फ्रयोग अथवा व्यवस्थापनात किंवा इतर कसलीही मदत हवी असेल तर मोहन साटम हे अग्रस्थानी असत. परोपकारी विनूचे संस्कार त्यांच्यावर खोलवर रुजलेले. त्यामुळे निर्मात्याचा, कलावंतांचा विचार यांना फ्राधान्य. लागेल ती मदत साटम विनातक्रार करीत. एक दिवस ‘ती फुलराणी’चा पुण्याच्या टिळक स्मारकातला दुपारचा फ्रयोग करून साटम मुंबईला निघत होते. संध्याकाळी व रात्री टिळक स्मारकमध्ये ‘गणरंग’च्या ‘निर्णय तुमच्या हाती’ या नाटकाचे दोन फ्रयोग होते. त्या नाटकात एक छोटीशी भूमिका करणारा माणूस आला नव्हता. ‘गणरंग’चे सूत्रधार संतोष कोचरेकर मोहन साटम यांना म्हणाले, ‘साटम, आमचा एक माणूस आला नाही. तेव्हा ‘तुम्ही निर्णय तुमच्या हाती’ या नाटकात काम करा. मोहन साटम यांनी लगेच त्या दोन फ्रयोगांत उत्तम काम केलंच, पण पुढेही त्या नाटकाचे बरेच फ्रयोग केले. तेव्हापासून ‘गणरंग’ संस्थेचे निर्माते विनय आपटे यांनाही मोहन साटम हे ‘आपला आर्टिस्ट’ वाटायचे.
‘सुयोग’च्या सुधीर भट यांनी ‘ती फुलराणी’चे 342 फ्रयोग झाल्यावर ‘गांधी विरूद्ध गांधी’ रंगमंचावर आणायचं ठरवलं. त्याचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी करीत होते. नाटकासाठी कलावंत हवेत म्हणून त्यांनी ‘ऑडिशन’ घ्यायची असं ठरवलं. सुधीर भट चंकुंना म्हणाले, ‘तुला कुणाची काय ऑडिशन घ्यायची ती घे’. मग साटमांकडे बोट करून भट म्हणाले, ‘हा माझा माणूस. तो मला नाटकात पाहिजेच’. चंद्रकांत कुलकर्णींनी त्यांना महादेवभाई देसाईंची भूमिका दिली. ही भूमिकाही रसिकांच्या स्मरणात राहिली.
मोहन साटम यांचं अक्षर वळणदार, सुंदर, सुवाच्य. माणसाचं व्यक्तिमत्त्व, स्वभाव त्याच्या अक्षरातून डोकावतो म्हणतात, ते मोहन साटम यांना तंतोतंत लागू होतं. ज्या नाटकात ते काम करीत त्या नाटकाच्या पुढच्या फ्रयोगांच्या तारखा, वेळा, नाटय़गृह फलकावर लिहून ठेवण्याची जबाबदारीही निर्माते लोक मोहन साटमांवर टाकीत. टापटीपपणा, व्यवस्थितपणा हाही त्यांचा एक स्वभावविशेष. त्याचा फायदा जसा त्यांना होतो तसा तो इतरांनाही होतो. मोहन साटम यांच्या अनेक भूमिका लक्षणीय ठरल्या. त्यात ‘बेबंदशाही’मधील राजाराम, छत्रपती संभाजी, ‘नटसम्राट’मधील विठोबा, ‘ती फुलराणी’मधील मालवणी, ‘तरुण तुर्क…’मधील फ्रा. बारटक्के, ‘तो मी नव्हेच’मधील अग्निहोत्री, सुब्रह्मण्यम, बॅ. विफ्रदास, ‘गांधी विरुद्ध गांधी’मधील महादेवभाई देसाई, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मधील हंबीरराव, अण्णाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजदेखील! ‘जावई माझा भला’मधील कॉण्ट्रक्टर शेवडे, ‘सरगम’मधील जयवंतराव काळे, ‘सागर सम्राट सिंधुदुर्ग’मधील शिवाजी, ‘तुमचा मुलगा करतो काय’मधील आनंदा, ‘डॉ. तुम्हीसुद्धा’मधील साने, ‘अतिथि देवो भव’मधील कॉण्ट्रक्टर मोघे, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’मधील बाबासाहेब… अशा किती भूमिका सांगाव्यात.
भूमिका छोटी आहे म्हणून नाटक सोडणाऱ्यांपैकी साटम नव्हेत; कारण त्यांचे गुरुसम कलावंत मित्र नारायण जाधव यांनी त्यांना दिलेला कानमंत्र. ‘‘भूमिका छोटी असली तरीही संस्था, लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कलावंत यांच्याकडे बघून नाटक सोडायचं नाही.’’ कलावंताच्या आयुष्यात असे मेंटर येणं भाग्याचंच! हिंदुस्थानचा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा होत असतानाच मोहन साटम आपल्या रंगमंचीय कारकीर्दीचा ‘सुवर्ण महोत्सव’ साजरा करीत आहेत असेच म्हणणे योग्य ठरेल.





























































