तितली उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

बालपणी ती सारखी रेडिओवर लागणारी गाणी ऐकायची. मग तेच गाणं गुणगुणायची. तिचा हा सांगीतिक गुण तिच्या आईच्या लक्षात आला आणि मुलीला रीतसर गाणं शिकवणं सुरू झालं. तसं तामीळनाडूमधल्या घराघरात संगीत, नृत्य याची जोपासना होतच असते. शारदा राजन अय्यंगार अशाच कुटुंबात जन्माला आल्या. त्यांच्या गायिकीने प्रभावित झालेल्या राज कपूरने हिंदी सिनेसृष्टीत त्यांना पहिल्यांदा ब्रेक दिला.

एका कार्यक्रमात या तामीळ मुलीचं गाणं ऐकून राज कपूर यांनी तिला त्यांच्या मुंबईतल्या प्रसिद्ध ‘आरके’ स्टुडिओमध्ये आवाजाची ‘मायक्रोफोन’ टेस्ट देण्यासाठी बोलावलं. अनेक वाद्यं वाजवू शकणाऱ्या आणि गाणंही बरं म्हणणाऱ्या राज कपूर यांनी तिला ‘पास’ केलं आणि संगीतकार शंकर-जयकिशन यांच्याकडे पाठवलं. त्या वेळी या जोडीचं नाव म्युझिक फिल्म इंडस्ट्रीवर ‘छा गया’ म्हणतात तसं गाजत होतं. लता, आशा, रफी, मुकेश अशा दिग्गज गायक-गायिकांनी त्यांची गाणी गाजवलीच होती. त्याच वेळी शारदा त्यांच्याकडे आली. ‘सूरज’ चित्रपटातलं शैलेन्द्र यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि वैजयंतीमालावर चित्रित झालेलं गाणं शारदा यांनी गायिलं आणि ते सुपरहिट ठरलं. या गाण्यात वैजयंतीमालाबरोबर घोडागाडीत मुमताजही दिसते. गाणं आहे ‘तितली उडी, उड जो चली…’
त्या काळात हे गाणं एवढं लोकप्रिय झालं की, तरुणाईच्या तोंडी सतत ऐकू येऊ लागलं. शारदाच्या तमीळ ऍक्सेन्टचा काहीसा प्रभाव गाण्यावर जाणवतच होता, पण शंकर-जयकिशनचं वेगवान संगीत आणि चाल यामुळे गाण्याने धमाल उडवली. या गाण्याने ‘फिल्मफेअर ऍवॉर्ड’च्या बाबतीत इतिहास घडवला. ‘सूरज’ चित्रपटासाठी ‘बहारो फूल बरसाओ’ गाण्याला महंमद रफीसह शारदा यांच्या गाण्यासही तितकीच मतं मिळाली. हे प्रथमच घडत होतं. शारदा यांना ऍवॉर्ड नाही मिळालं, परंतु या पुरस्कारापासून ‘बेस्ट फिमेल सिंगर’चा स्वतंत्र समावेश झाला.

त्यांचं पहिलं ‘फिल्मफेअर’ त्यांना मिळालं ते ‘जहां प्यार मिले’ या चित्रपटातील ‘बात जरा है आपस की’ या गाण्यासाठी. हेलनच्या नृत्यासाठी हे गीत चित्रित झालं होतं, मात्र ‘तितली उडी’ हे शारदाचं ‘सिग्नेचर साँग’ ठरलं. आजही शारदाचा स्वर म्हटलं की, हेच गाणं आठवतं. शारदा यांनी शब्दबद्ध केलेलं एक गाणं लतादीदींनी ‘गर्म खून’ चित्रपटासाठी गायिल्याचं म्हटलं जातं. सुलक्षणा पंडित ते पडद्यावर गाते. नायक आहे विनोद खन्ना. गाण्याचे बोल ‘एक चेहरा दिल के करीब आता है, खयालों को दूर दूर ले जाता है.’ कवयित्रीचं नाव मात्र ‘सिंगार’ असं होतं. शारदा यांच्या गाजलेल्या गाण्यांपैकी ‘दुनिया की सैर कर लो’, ‘बहारों फूल बरसाओ’, ‘वो परी कहां से लाउंै?’, ‘जब भी ये दिल उदास होता है’, ‘देखो मेरा दिल मचल गया’ ही गाणी गानरसिकांना आजही आठवतील. शारदा यांनी संगीतकार म्हणून ‘मां बहेन बिबी’, ‘मैला आंचल’, ‘क्षितिज’ असे काही चित्रपटही केले. आशा भोसले, महंमद रफी, मुकेश, सुमन कल्याणपूर, येशूदास अशा सहगायकांसोबत गाणी गायिली. शंकर- जयकिशन तर या क्षेत्रातले त्यांचा गायिका म्हणून इंडस्ट्रीत आणणारे संगीतकार. याशिवाय त्यांनी उषा खन्ना, रवी, दत्ताराम आदी संगीतकारांकडेही गाणी गायिली.

त्या काळात ‘बक्कम्मा बक्कम्मा एक्कड बोतोरा’ नावाचं एक भन्नाट गाणं गायलं होतं. महेमूद आणि हेलन यांच्या नृत्यावर या गाण्याचं चित्रीकरण झालं. ‘बक्कम्मा ओ।़।़ बक्कम्मा।़।़’ अशी आरोळी ठोकणारा महेमूद आणि हेलन यांनी या गाण्यात धमाल उडवली. रफी यांनी तामीळ ढंग मस्त रंगवला. हेलनचा स्वर होता शारदा यांचा. ‘शतरंज’ सिनेमातलं हे गाणं तेव्हा पानाच्या ठेल्यावरही वाजायचं. आजही हे गाणं ‘ऑर्केस्ट्रा’त म्हटलं जातं. स्वतः शारदा आणि महंमद रफी तसंच महेमूद यांचं ‘स्टेज शो’मधलं गाणं यूटय़ुबवर बघता येतं. शारदा यांनीही नंतरच्या काळात अनेक कार्यक्रम केले. आता त्यांच्या मराठी गाण्यांविषयी. ‘ती मी नव्हेच’ नावाचा एक चित्रपट येऊन गेला. माझ्या आत्याचे मिस्टर विद्याधर परांजपे यांनी त्यात छोटंसं काम केलं होतं म्हणून लक्षात राहिला. आता यूटय़ुबवर काही तो सापडला नाही, पण त्यातली तीन गाणी शारदा राजन यांनी गायिलेली आहेत. यापैकी एक गाणं ‘दिल तो धडकना तेरे, दिखा दूं रे राजा’ हे गाणंच हिंदी आहे, पण आणखी दोन मराठी गाणीही शारदा यांच्या स्वरात ऐकायला मिळतात.
‘कशी मी सांगू राजा,
जगाचा रिवाज
दुनिया चाले उलटी,
अहो दुनिया चाले उलटी,
खऱ्याचं नाही राज’
हे ठसकेबाज सोलो गाणं लिहिलंय रमेश अणावकर यांनी आणि संगीत सूरज यांचं आहे. दुसरं गाणं बहुतेक तुम्हाला आठवेल,
‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा, दिसतां कसो खंडाळय़ाचो घाट’
हे गाणं त्या वेळी गाजलं होतं. शब्द रमेश अणावकर यांचेच आणि संगीत सूरज यांचं, परंतु यामध्ये शारदा यांच्या बरोबरीनेच जयवंत कुलकर्णी हे गीत गातात. 1966 मध्ये मुंबईत चित्रपट गायिका झालेल्या शारदा यांनी ‘कांच की दीवार’ या चित्रपटासाठी बहुधा शेवटचं गायन केलं. त्यातलं ‘बिछड गये है जो रास्ते में, कही न उनका पता मिलेगा’ हे शारदा यांचं हिंदीमधलं पडद्यावरचं शेवटचं ‘सोलो’ गीत असावं.