
>> अरुणा सरनाईक
गणेशोत्सव आता तोंडावर आला आहे. आपल्यासमोर अनेक विघ्ने असताना हा गणराज विघ्नहर्ता बनून आपल्यासमोर येत आहे. गणपतीला काय आवडते, त्याची पूजा कशी करावी, त्याची मूर्ती कशी असावी याचेही काही नियम आहेत. ते आपण समजून घेतले पाहिजेत. ते समजून घेऊन विघ्नहर्त्याची मनापासून पूजा केली तर अनेक प्रकारच्या विघ्नांपासून आपली सुटका होईल. त्यामुळे अशा शुद्ध मनानेच गणेशाचे स्वागत करण्यास आपण पुढे झाले पाहिजे.
भा द्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला महासिद्धिविनायकी चतुर्थी म्हणतात. रविवारी अथवा मंगळवारी आल्यास तिचे महत्त्व अधिकच वाढते. हिला वरद चतुर्थी आणि शिवा चतुर्थी असेही म्हणतात. चतुर्थी ही श्री गणेशाची प्रिय तिथी. चतुर्थी म्हणजे जागृती. प्रत्येक प्राणिमात्राला चार प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो असे मानले जाते. गर्भज म्हणजे प्रसूतिजन्य, देहज म्हणजे बाल्यावस्था, अंतिम म्हणजे मरणात्मक आणि याम्यज म्हणजे यमलोक. यातून मुक्त होण्यासाठी, पुरुषार्थ प्राप्त करून देणारे व्रत म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते.
गणेशाला काहीही अर्पण करताना विषम संख्येत अर्पण करतात. विषम संख्या शक्तीशी संबंधित असतात. गणेशाला 21 दूर्वा वाहतात. 21 हा आकडा संख्याशास्त्रानुसार 2 अधिक 1 बरोबर 3 असा आहे. गणपती तीन या आकडय़ाशी संबंधित आहे. तीन हा आकडा कर्ता, धर्ता याबरोबर हर्ताही आहे. महादेवाला तीन पानांचीच बिल्वपत्रे वाहतात. दूर्वा वाहण्यामागील कथा फार रोचक आहे. अमलासुराचा वध गणेशाने त्याच्यापेक्षा आकाराने मोठा होऊन, त्याला गिळंकृत करून केला. त्यावेळी गणपतीच्या शरीराचा जो दाह झाला तो कोणत्याही उपायाने शांत होईना. त्यावेळी उदरातील अनल शांत करण्यासाठी विष्णूने कमळ, ब्रह्मदेवाने दोन मानसकन्या दिल्या. वरुणाने जल, इंद्राने चंद्र, शंकराने सहस्र फणांचा नाग देऊनही श्री गणेशाच्या उदरातील अनल शांत झाला नाही. तेथे आलेल्या ऋषींनी मिळून त्याच्या मस्तकावर प्रत्येकी 21 दूर्वा वाहिल्या आणि त्याचा अंगदाह कमी झाला. ही कथा असली तरी शास्त्राrय दृष्टिकोनाने पाहता दूर्वा या शीतकारक आहेत. शमीपत्रामागील ही भूमिका अशी की, धनिष्ठा नक्षत्राचा वृक्ष शमी असून दसऱ्याला शमीपूजनानंतर सीमोल्लंघन करतात हे आपल्याला माहीत आहेच. दुष्कृत्यांचा नाश करणारी, अमंगलाचे मंगल करणारी शमी श्री गणेशाला प्रिय असल्यास नवल ते काय! याची साले, पाने आणि फळे औषधी उपयोगी आहेत. गणेशाला प्रिय 21 पत्री, मधुमालती, माका, बेलपत्र, दूर्वा, धोतरा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, मंदार, अर्जुन, विष्णुकांत, डाळिंब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केवडा, हादगा, बोर या वनस्पती औषधी वनस्पती म्हणूनदेखील ओळखल्या जातात. प्रत्येक पत्रीमध्ये काही ना काही औषधी उपयोगी गुणधर्म आहेतच. श्रींचा आवडता प्रसाद मोदक. ‘मोद’ म्हणजे आनंद, ‘क’ म्हणजे लहानसा भाग! हाती धरलेला मोदक म्हणजे आनंद देणारी शक्ती होय. मोदक हे ज्ञानाचे प्रतीक. त्याला ‘ज्ञानमोदक’ असेही नाव आहे. कारण ज्ञानाचाही आनंद असतोच ना? नैवेद्याला 21 मोदक करतात. त्याच्या जोडीला करंजीदेखील असते. मोदक-करंजी बहीणभाऊ मानल्या जातात. आपल्याकडे प्रत्येक सणाला, पदार्थांना नात्याची, भावनेची जोड ही असतेच असते. कारण आपण नातेसंबंध जपणारे, संस्कृतीप्रिय आहोत.
शास्त्राप्रमाणे गणेशमूर्ती शाडूची असावी. ती 9 ते 10 इंचच उंच असावी. अथर्वशीर्षात ज्याप्रमाणे वर्णन केलेले आहे तशी असावी. एक दात असलेली, चार हात असलेली, पाश आणि अंकुश ही दोन शस्त्रs हातात धारण केलेली. उरलेल्या एका हातात तुटलेला दात, दुसऱ्या हाताने प्रसाद मद्रा करून भक्तांना आशीर्वाद देणारी हवी. कान मोठे सुपासारखे, लंबोदर मूषकासहीत अथवा मूषकावर स्वार असणारी गणेशमूर्ती असावी. घराण्याच्या परंपरेनुसार उजव्या सोंडेचा अथवा डाव्या सोंडेचा गणपती पुजला जातो.
‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती सगळीकडेच म्हटली जाते. तसंच ‘सेंदूर लाल चढाओ’ ही आरतीही प्रसिद्ध आहे, पण त्या आरत्यांचा अर्थ आपण समजून घेतो का? हा प्रश्नच आहे. ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती यात ‘दास रामाचा वाट पाहे सदना’ हा ‘रामाचा दास’ कोण असावा? अर्थात रामदास स्वामी! यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. पातुंड! ‘पान तुडयंति’ असा पातुंड! जे पा म्हणजेच दुष्ट असतात त्यांचा नाश करणारा असा. ‘त्रिनयना’ म्हणजे तीन नेत्र असणारा. भगवान शंकरांप्रमाणे त्याच्या या पुत्राला तीन डोळे आहेत. गणपतीचा तिसरा डोळा ज्ञानाचा समजला जातो. तो लंबोदर आहे. कारण तो सर्वांचे सर्व अपराध पोटात घालतो म्हणून. अशा अर्थासहीत जाणून श्रद्धेने हळू आवाजात आरती म्हणावी. मुलांना आरतीचा अर्थ समजावून सांगावा.
कशा प्रकारे गणेशपूजन केल्याने ते फलदायी होते? असा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतोच. गणेशाला अष्टद्रव्य अपर्ण केले जाते. धनप्राप्तीसाठी कमळ, बेल अथवा बेलफळ दूर्वांसोबत वाहिल्यास धनप्राप्ती होते. गणेशाला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. त्या न वाहिल्यास पूजा अधुरी राहते असा समज आहे. लाल फुले, त्यातल्या त्यात जास्वंद अािण कण्हेर अधिक. मध, तुपासोबत दूर्वांची आहुती दिल्यास समृद्धी आणि आनंद मिळतो. मेव्याची खीर आहुतीत दिल्यास संतानप्राप्ती होते असा भावपूर्ण समज आहे. खरे तर देवाला फक्त श्रद्धायुक्त अंत:करणाने शरण जाणे हीच खरी पूजा आहे असे मला वाटते. त्याला माहीत असते, कोणाला केव्हा अन् किती द्यायचे. आपल्या भक्तांची काळजी आणि अपराध पोटात घ्यायला तो सदैव सज्ज आहे.
श्री गणेश आद्य दैवत आहे. कोणत्याही मंगल कार्यापूर्वी गणेशपूजन केले जाते. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्रीगणेशाच्या मूर्तीची साग्रसंगीत स्थापना केली जाते. घराण्याच्या परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस मूर्तीचे पूजन केले जाते. सध्याच्या व्यस्त जीवनात प्रत्येकाला पूजेकरिता गुरुजी मिळणे शक्य नाही. पूजाविधीच्या सीडी बाजारात उपलब्ध असतात. यूटय़ूबवर गणेशपूजेचे व्हिडीओही आता उपलब्ध झाले आहेत. त्यांचा आधार नक्कीच घेता येईल. अन्यथा मानसपूजा चांगली. कारण सरतेशेवटी मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत निश्चितच पोचते. जिथे जो भाव तसा तो देव प्रकटतो. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती केली आहे. देशकार्यासाठी त्यांना गणेशपूजनाला मुहूर्ताची, गुरुजींची आवश्यकता भासली नाही. टिळकांची कळकळ पाहून स्वत: विघ्नहर्ता त्यांच्या मदतीला धावून आला.
गणेशपूजनाला लोकमान्यांनी एक ठरावीक दृष्टिकोनाने सार्वजनिक स्वरूप दिले. आज त्यामागील कारण आपण जाणले पाहिजे. सण-उत्सव साजरे झाल्यावर उरलेला पैसा समाजकार्यासाठी वापरला गेला पाहिजे. ‘आहे रे’ वर्गाकडून ‘नाही रे’ वर्गाकडे धनसंपत्तीचे मार्पामण होण्यातून सामाजिक समता प्रस्थापित होणार आहे. आपली हिंदुस्थानी संस्कृती ही दानमहिमेची शिकवणूक देणारी आहे.
हिंदुस्थान हा उत्सवप्रिय देश म्हणून संपूर्ण विश्वभरात ओळखला जातो. हे सण-उत्सव पाहण्यासाठी परदेशी नागरिक मोठय़ा संख्येने इथे येतात. ते परत जातात तेव्हा त्यांनी इथली भक्ती, श्रध्दा, देशभक्ती, शिस्त, एकोपा आणि इथला आनंदोत्सव यांच्या आठवणी न्यावयास हव्यात आणि दरवर्षी त्यांना पुन: पुन्हा यावेसे वाटले पाहिजे. उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी, सुरक्षा, अपघात याविषयी जागरूकता बाळगावी. उत्सवाचे दिवस आपल्या जीवनात आनंद निर्माण करतात. गरीब, श्रीमंत, आबालवृद्ध, स्त्राr-पुरूष उत्सवात सामील होतात. दु:ख विसरायला लावतात. घराघरात आनंदाचे मंगलमय पवित्र वातावरण निर्माण करतात. हे मांगल्य चैतन्यदायी असते आणि चिरंतन असते.



























































