केजरीवाल-आदित्य ठाकरे यांच्यात विरोधी ऐक्यावर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी आज आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात सर्वपक्षीय आघाडी आकाराला येत असताना ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सुमारे तासभराच्या या भेटीत विरोधी ऐक्याबरोबरच, दिल्ली सरकार राबवत असलेल्या अनेक लोकोपयोगी व लोकप्रिय योजनांची माहितीही अदित्य ठाकरे यांनी केजरीवाल यांच्याकडून जाणून घेतली.

अदित्य ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची आज भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. केंद्रातील भाजपा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक असून त्या दृष्टीनेही या भेटीत चर्चा झाली. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राबविलेली मोहल्ला क्लिनीक योजना, पाणी व विजेसंदर्भातील लोकपोयोगी योजना, दिल्लीतील शाळांचा सुधारेलला दर्जा, या मुद्दय़ांवरही या भेटीत चर्चा झाली. आम आदमी पार्टीने दिल्लीत राबविलेल्या योजना तसेच इतर राज्यांमध्ये पक्षाचा होत असलेल्या विस्ताराबाबत केजरीवाल यांनी अदित्य ठाकरे यांना सविस्तर माहिती दिली. अदित्य यांनी दिल्ली सरकारच्या लोकप्रिय योजनांची माहिती यावेळी केजरीवाल यांच्याकडून घेतली. या भेटीवेळी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह व शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी या उपस्थित होत्या.