पाकिस्तानने हल्ला केला तर राज्यांनी शस्त्रास्त्रे विकत घ्यायची का? केजरीवालांचा केंद्राला चिमटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind_kejriwal

देशात लसींचा तुटवडा आहे. लसी नसल्याने लसीकरण केंद्रे बंद आहेत. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठीही बरीच धडपड करावी लागत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरून राज्यांनी केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर ‘पाकिस्तानने हल्ला केला तर राज्यांनी शस्त्रास्त्रे विकत घ्यायची का?’ अशा शब्दांत केंद्राला चिमटा काढला आहे.

केंद्र सरकारने यापुढे लसींची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे. त्यावरून केजरीवाल यांनी केंद्रावर हल्ला चढवला आहे. ‘कोरोना प्रतिबंधक लसींसाठी केंद्र सरकार गंभीर नाही. त्यांनी राज्यांना लसींची व्यवस्था करायला सांगितली आहे. राज्य सरकारे प्रयत्न करत आहेत, परंतु अद्याप एकाही राज्याला लसी विकत घेता आलेल्या नाहीत. निविदा काढूनही त्या रद्द कराव्या लागल्या आहेत. कारण लस कंपन्या केंद्र सरकारशी संपर्क साधा, असे सांगत आहेत.’ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

कोरोनाशी आपले युद्ध सुरू असताना राज्यांनी त्यांचे बघून घ्यावे, असे केंद्र सरकार सांगू शकत नाही. उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर युद्ध सामुग्री राज्यांना विकत घ्यावी लागेल का? उत्तर प्रदेशने रणगाडे आणि दिल्लीवाल्यांनी शस्त्रांची व्यवस्था करा, असे केंद्र सरकार सांगणार आहे का?’ असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशातील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी राज्याराज्यांमध्ये विभागणी करण्याऐवजी एकसंध हिंदुस्थान म्हणून पुढे जावे लागेल, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.