काँग्रेसला स्वत:चे घर सांभाळता येत नाहीय! राजस्थानमधील राजकीय नाट्यावरूर केजरीवाल यांनी डिवचलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील राजकीय नाट्य रंगात आले आहे. मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचा गट आमनेसामने आला आहे. गेहलोत समर्थांनी पायलट यांच्या नावाला विरोध करत राजीनामास्त्र बाहेर काढल्याने काँग्रेसपुढे मोठे संकट उभे राहिले. काँग्रेसमधील या अंतर्गत गटबाजीवर आता विरोधकांनीही टिप्पणी सुरू केली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला डिवचलं आहे.

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आमचा पक्ष जनतेसाठी काम करत असून, शाळा, रुग्णालयांची बांधणी करतोय. जनतेला तोडफोडीचे राजकारण आवडत नाही. दिल्ली, पंजाबनंतर गुजरातमध्ये आता आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होईल. काँग्रेसला स्वत:चे घर सांभाळता येत नाही, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

हायकमांडने ‘हात’ आखडला, अशोक गेहलोत अध्यक्षपदाच्या रेसमधून जवळपास बाहेर; ‘ही’ चार नावं चर्चेत

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस तोड-फोडीचे राजकारण करतात. ते म्हणतात केजरीवालांनी मोफत देण्याचे बंद करावे. आज देशातील जनतेला आम आदमी पक्षाकडून अपेक्षा आहेत. आम्ही देशाला पुढे घेऊन जाणार आहोत,’ असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

राजस्थानमध्ये काय सुरुय?

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अशोक गेहलोत हे प्रमुख दावेदार होते. गांधी कुटुंबाचे अत्यंच निकटवर्तीय आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद आणि पक्षाध्यक्षपद अशी दोन्ही पदे हवी होती. परंतु पक्षाच्या एक पद एक धोरणानुसार गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतील अशी आशा होती. परंतु गेहलोत समर्थक आमदारांनी दबावतंत्राचा वापर केला आणि राजीनामास्त्र बाहेर काढले. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली.