
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप, टीका सुरू आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोमवारी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना “प्रवासी पक्षी” म्हणून संबोधले. ते म्हणाले की, ‘ते खोटी आश्वासने देऊन लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये जातात आणि कधीकधी दिल्लीला परत येतात.’
सिद्धू यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर पंजाबच्या जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला. केजरीवाल यांच्याकडे राज्याचा कोणताही रोडमॅप नाही आणि त्यांना दिल्लीतून पंजाब रिमोर्ट कंट्रोलने चालवायचा आहे, असा दावा त्यांनी केला.
केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात एकही पंजाबी नाही, मग ते पंजाबच्या भल्याचा विचार कसा करू शकतात, असे काँग्रेस नेते म्हणाले.
‘आप’च्या ‘जनता चुनेगी अपना मुख्यमंत्री’ मोहिमेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी क्रिकेटपटूने याला ‘नाटक’ म्हणून संबोधले. ‘दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवताना केजरीवाल यांनी जनतेकडून असे मत मागितले नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यात वेळ घालवला नाही’, असे ते म्हणाले. ‘मला गुरु म्हणणारे माझे जुने मित्र भगवंत मान यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. मात्र त्यांना मूर्ख बनवण्यासाठी केजरीवाल यांचे हे नाटक सुरू आहे.’
पंजाबमधील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर काही नेत्यांनी बंडखोरी केल्याबद्दल विचारले असता सिद्धू म्हणाले की, ‘मी त्या नेत्यांना पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो आणि गरज पडल्यास ते एकत्रितपणे त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू.’



























































