पंच्याहत्तरी पूर्ण झाल्यावर PM राहणार की नाही? केजरीवाल यांचा मोदींना बोचरा सवाल

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या (25 मे 2024 ) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केल्यानंतर PM राहणार की नाही, मोदींनी याचं उत्तर द्यावं? असा सवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मोदी नाही तर अमित शहा पीएम होणार, असे तुम्ही कसे काय म्हणता? असा प्रश्न केजरीवाल यांना विचारण्यात आला. इंटरनेटवर तुम्ही सर्च करा. 2019 मध्ये स्वतः अमित शहा यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या सर्वांना रिटायर्ड करण्यात येत आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये कोणालाही कोणतेही पद दिले जाणार नाही. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी स्वतः हा नियम बनवला होता. यानुसार लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांना रिटायर करण्यात आले होते. अनेकांची तिकीटे कापण्यात आली होती, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

आता त्यांनी जो नियम बनवला आहे, तो स्वतःलाही ते लागू करतील. ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींनी एक-एक करून सर्वांचा पत्ता कापला, ते पाहता उत्तराधिकारी होण्यासाठी अंतर्गत मोठा कलह सुरू आहे. शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहरलाल खट्टर, डॉ. रमन सिंह, देवेंद्र फडणवीस यांना हटवण्यात आले. आता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवण्याची चर्चा आहे. यामुळे अमित शहांचा मार्ग मोकळा होईल, ते पंतप्रधान होतील, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. भाजपच्या अंतर्गत मोठा तणाव आहे. पंतप्रधान मोदींना अमित शहा यांना आपला उत्तराधिकारी बनवायचे आहे. पण इतरांना ते मान्य नाही, असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

अटक झाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही? यावरही अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दिल्लीत माझा पराभव करू शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. यामुळे केजरीवालला अटक करा, मग तो राजीनामा देईल, असे षडयंत्र आहे. माझ्यानंतर पुढचे टार्गेट ममता बॅनर्जी आ, पिनराई विजयन असतील. ममतांना अटक करून त्यांचे सरकार पाडण्यात येईल. विजयन यांना अटक करून केरळमधील त्यांचेही सरकार पाडण्यात येईल. मी राजीनामा दिला तर देशातील लोकशाहीला मोठा धोका निर्माण होईल, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

पदाचा लोभी नाही- केजरीवाल

मी पदासाठी आसुसलेला नाही. आयकर आयुक्ताची नोकरी सोडून मी झोपडपट्टीवासीयांसाठी काम केले होते. 49 दिवसांत स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पण मी संघर्ष करून इथे पर्यंत आलोय. त्यामुळे मी ही खुर्ची सोडणार नाही. त्यांनी याचिकाही केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मला पदावरून हटवण्यास नकार दिला. त्यामुळे मी राजीनामा देणार नाही. कारण जिथे-जिथे मोदींचा पराभव होईल, तिथे-तिथे मुख्यमंत्र्याला अटक केली जाईल, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला.