दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरावर ईडीचा छापा; केजरीवाल यांचा पारा चढला, भाजपवर घणाघात

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरासह 13 ठिकाणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापा टाकला आहे. ‘आप’ सरकारच्या काळात आरोग्य पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीचे अधिकारी सौरभ भारद्वाज यांच्या घरी उपस्थित असून यावर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आप’ला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.

‘आप’ सरकारच्या काळात आरोग्य पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी जुलै महिन्यात ईडीने माजी आरोग्य मंत्री सौरभ भारतद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी ईडीने मंगळवारी सौरभ भारद्वाज यांच्या घरासह 13 ठिकाणी छापेमारी केली.

मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. सौरभ भारद्वाज यांच्या घरावरील ईडीचा छापा हे त्यांचेच एक उदाहरण आहे. मोदी सरकार आम आदमी पार्टीच्या मागे लागले आहे. ज्या प्रकारे आपला लक्ष्य केले जात आहे, तसे इतिहासात कोणत्याही पक्षाला लक्ष्य करण्यात आलेले नाही, असे केजरीवाल म्हणाले.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आणि भ्रष्ट कामांविरुद्ध ‘आप’ आवाज उठवत असल्याने ‘आप’ला लक्ष्य केले जात आहे. मोदी सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र तसे कधीही होणार नाही. भाजपच्या छापेमारीने ‘आप’ घाबरणार नाही. देशहिताला प्राधान्य देत आम्ही चुकीचे काम आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत राहू, असेही केजरीवाल एक्स पोस्टमध्ये म्हणाले.

दरम्यान, 5,590 कोटी रुपयांचा हा कथित घोटाळा असून आपच्या कार्यकाळातील आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. 2018-19 मध्ये आपने 24 रुग्णालय प्रकल्पांना मंजुरी दिली होती. सहा महिन्यात अतिदक्षता रुग्णालये तयार करण्याची योजना होती. यावर 800 कोटी रुपयांहून खर्च करण्यात आला आहे. मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, असा आरोप केला जात आहे.

गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधानांनीही आपले पद सोडावे का? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहा यांना सवाल