अरविंद केजरीवाल यांचे गुजरातमध्ये शक्तीप्रदर्शन; आम्ही गुजरातींची मने जिंकायला आलो आहोत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या अहमदाबादमध्ये आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी रोड शो करत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील होते. आपण गुजरातमध्ये काँग्रेस किंव भाजपचा पराभव करायला आलो नसून गुजरातींची मने जिंकायला आलो आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले.

गुजरातमध्ये प्रत्येक तीन महिन्यांनी पेपर लिकची घटना घडत असते. अशा घटना थांबवायला हव्यात. भाजपा शिक्षण विकत आहे, यामुळे देशाची प्रगती कशी होणार, असा सवालही त्यांनी केला. कमळाचे फूल चिखलात उगवते आणि चिखल झाडूनेच स्वच्छ केला जातो. अहंकाराचा चिखल आम आदमी पक्षाला स्वच्छ करावा लागेल, असे भगवंत मान म्हणाले.

येथे उपस्थित असलेल्या सर्व जनतेमध्ये राष्ट्राबाबत सन्मान आहे. आपल्याला देशभक्ती करता येते. आपण सर्वसामान्य जनता आहोत. आपल्याला 10 वर्षांपूर्वी कोणीही ओळखत नव्हते. सुरुवातीला दिल्ली आणि नंतर पंजाबमध्ये आम्ही सरकार बनवले. दिल्लीत शाळा आणि रुग्णालयांचा दर्जा सुधारला.24 तास वीज देत आहोत. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये 10 दिवसात भ्रष्टाचार संपवला आहे. कोणतीही खासगी शाळा शुल्कवाढ करणार नाही असा आदेश मान यांनी दिला आहे. तसेच 25 हजार नोकऱ्या देण्यात येणार आहेत, असे केजरीवाल यांनी सांगितले.

गुजरातमध्ये भाजप 25 वर्षांपासून सत्तेत आहे. त्यांच्यात आता अहंकार आला आहे. आम्ही येथे काँग्रेस किंवा भाजपचा पराभव करायला आलेलो नाही. आपल्याला गुजरातींची मने जिंकायची आहेत. तसेच देशही जिंकायचा आहे. आपल्याला राजकारण येत नाही. तुम्ही भाजपला 25 वर्षे सत्ता दिली. आता एक संधी आपला द्या, असे आवाहनही केजरीवाल यांनी केले. आपल्याला भ्रष्टाचार संपवून गुजरातचा विकास करायचा आहे, असे ते म्हणाले. दिल्ली आणि पंजाबमध्ये भ्रष्टाचार संपल्याचा दावाही त्यांनी केला.