
हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेने परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करावे की नाही, हे ठरवणारा अमेरिका कोण? आणि हिंदुस्थानला अमेरिकेच्या परवानगीची गरजच काय?” असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याचा आरोप करत केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांवर निशाणा साधताना म्हटले की, गेल्या काही महिन्यांपासून देशवासीयांनी अतिशय वेदनेने पाहिले आहे की, तुम्ही ट्रम्पसमोर प्रत्येक पावलावर नतमस्तक होत आहात. ट्रम्प यांच्यासमोर साधी बोलण्याचीही तुमची हिंमत होत नाही, अशी कोणती मजबुरी तुम्हाला त्यांच्यासमोर झुकण्यास भाग पाडत आहे? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. हिंदुस्थान हा हजारो वर्षांचा इतिहास असलेला आणि 1.4 अब्ज लोकसंख्या असलेला एक महान देश आहे. या भूमीने अनेक शूर योद्धे दिले आहेत आणि हिंदुस्थानने आजवर कधीही कोणासमोर मान झुकवलेली नाही, याची आठवणही त्यांनी करून दिली.
भारत को रशिया से तेल ख़रीदने की इज़ाज़त देने वाला अमेरिका कौन होता है? भारत को अमेरिका से इज़ाज़त की क्यो ज़रूरत है?
पिछले कुछ महीनों में देशवासियों ने बहुत पीड़ा के साथ देखा है कि किस तरह एक के बाद एक, हर कदम पर आप ट्रम्प के सामने झुक गए और आपकी उसके सामने बोलने तक की हिम्मत… https://t.co/5Hk2ZOB5f3
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 6, 2026
देशाच्या इतिहासात हिंदुस्थानचे नेतृत्व इतके कमकुवत कधीच नव्हते, अशी टीका करत केजरीवाल पुढे म्हणाले की, जर तुमची खरोखरच काही वैयक्तिक मजबुरी असेल ज्याचा फायदा ट्रम्प घेत आहेत, तर देशाच्या हितासाठी तुम्ही पदाचा राजीनामा द्यावा. मात्र, अशा प्रकारे भारतमातेची मान झुकवू नका, कारण यामुळे सर्व देशवासीयांच्या भावना दुखावत आहेत. रशियाकडून तेल आयातीच्या मुद्द्यावरून अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेवर हिंदुस्थानने ठाम राहण्याऐवजी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे चित्र निर्माण झाल्याने केजरीवाल यांनी हा हल्लाबोल केला आहे.



























































