केजरीवाल इन ऍक्शन, पदभार स्वीकारला

323
arvind_kejriwal

काँग्रेस आणि भाजपला चारी मुंडय़ा चीत करून सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. यासोबतच त्यांनी आपल्या मंत्र्यांची खातीही जाहीर केली. यावेळी त्यांनी स्वतःकडे कोणतेही खाते घेतलेले नाही. पटपडगंज येथील आमदार मनीष सिसोदिया गेल्या टर्मप्रमाणे यावेळीही उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री ही दोन पदे सांभाळणार आहेत.

केजरीवाल यांच्या आधीच्या कार्यकाळात ग्रामीण विकास व रोजगारमंत्री असलेले बाबरपूरचे आमदार गोपाळ राय यांना यावेळी पर्यावरण मंत्रालय देण्यात आले आहे, तर शकूर बस्तीचे आमदार सत्येंद्र जैन यांना जल बोर्डाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्यावेळी ते आरोग्यमंत्री होते. महिला व बालविकास मंत्रालयाची जबाबदारी केजरीवाल यांनी राजेंद्र पाल गौतम यांना दिली आहे. हे मंत्रालय यापूर्वी मनीष सिसोदिया पाहत होते.

कॅबिनेटमध्ये एकही महिला नाही

अरविंद केजरीवाल यांच्या तिसऱ्या टर्ममधील मंत्र्यांची नावे आणि खाती जाहीर करण्यात आली, मात्र यात एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही. रविवारी केवळ सहा मंत्र्यांनी सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोत, गोपाळ राय, इमरान आणि मनीष सिसोदिया यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या