दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्यात येणार; पक्षाच्या प्रचाराला वेग देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका ट्विटद्वारे गोव्यात येण्याची घोषणा केली आहे. आमच्या जीवनात धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रे यांची महत्त्वाची भूमिका आहे. केवळ देवाच्या आशीर्वादानेच आपल्याला नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळते. मी माझ्या गोव्यातील बांधवांशी बोलण्यासाठी उद्या गोव्यात येईन, असे ट्विट त्यांनी केले आहे.

केजरीवाल यांनी यापूर्वी गोव्यात दौरा करत 24/7 मोफत वीज आणि नोकरीची हमी दिली आहे. गोव्यात 2022 च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी केजरीवाल दोन वेळा राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी राज्याचा ते तिसरा दौरा करणार आहेत. ‘आप’ राज्यभर आक्रमकपणे प्रचार करत आहे. दयानंद नार्वेकर, बाबू नानोस्कर, सत्यविजय नाईक, राजदीप नाईक, गणपत गावकर, डॉमिनिक गावकर, रितेश चोडणकर आणि अमित पालेकर यांसारख्या मोठ्या जननेत्यांनी अलीकडेच आप मध्ये प्रवेश केल्याने पक्षाला बळकटी मिळाली आहे. पक्षाने आणि पक्षाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या परिश्रमामुळे पक्षाने खऱ्या अर्थाने गोव्यातील मतदारांना सक्षम केले आहे, असे ते म्हणाले. सोमवारी ते गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात गोवा दौऱ्यावर असताना राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यावर प्रत्येक तरुणाला रोजगार देण्याची हमी जाहीर केली होती. जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक तरुणाला रोजगार आणि दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. केजरीवाल यांनी गोव्यातील तरुणांसाठी खासगी क्षेत्रातील 80 टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याची घोषणा केली. पर्यटन आणि खाणकाम बंद पडल्यामुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबांना मासिक 5,000 रुपये दिले जातील. दिल्लीच्या DSEU च्या धर्तीवर AAP सरकार गोव्यात एक कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार आहे. ‘आप’ गोव्यातील सरकारी नोकऱ्यांमधील घराणेशाही संपवेल आणि सर्वसामान्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या गोवा दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष आहे. आम्ही राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे गोव्यात स्वागत करतो! सर्व गोवेकर त्यांच्या भेटीसाठी उत्सुक आहेत असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले.