
बॉलीवूड चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. यामागचे कारण म्हणजे बॉलीवूडचा ‘हाय प्रोफाईल’ दर्जा. बॉलीवूडला ‘हाय प्रोफाईल’ची किंमत मोजावीच लागेल, असे मत ज्येष्ठ गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे. चौकशीच्या नावाखाली बॉलीवूड व बडय़ा सेलिब्रिटींना निशाणा बनवले जात आहे, असे ते म्हणाले. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर अख्तर यांच्या या मताला महत्त्व आले आहे. जुहूत ‘चेंजमेकर्स’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. बॉलीवूडला अधूनमधून छापे टाकून टार्गेट केले जातेय असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नावर ते म्हणाले, ज्यावेळी तुम्ही ‘हाय प्रोफाईल’ बनता त्यावेळी तुम्हाला खाली खेचण्यात, तुमच्यावर चिखल उडवण्यात सगळ्यांना मजा येते.




























































