तुम्ही पडद्यामागून भाजपला मदत करता का…या प्रश्नावर असदुद्दीन ओवैसी संतप्त…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे भाजपच्या बी टिमप्रमाणे काम करत असल्याचा आरोप नेहमीच होतो. एका वृत्त वाहिनीवरील मुलाखतीत ओवैसी यांना तुम्ही पडद्यामागून भाजपला मदत करता का, असा सवाल विचारण्यात आल्यावर ओवैसी संतप्त झाले. तसेच याबाबत त्यांनी काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार विरोधकांच्या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. त्यामुळे तुम्ही भाजपविरोधी असूनही तुम्ही भाजपची मदत करत आहात, असे दिसते. तुम्ही पडद्यामागून भाजपला मदत करता का, असा सवाल ओवैसी यांना करण्यात आला. या प्रश्नावर संतप्त होत ओवैसी म्हणाले, आपण काँग्रेसविरोधात जे सांगत आहोत, त्यात तथ्य नाही काय, असा प्रतिसवाल त्यांनी केला.

भाजप सत्तेत आली, याला काँग्रेस जबाबदार नाही का, काँग्रेसमुळेच भाजप सत्तेत आल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमध्ये 1984 मध्ये मुस्लीम खासदार होता. त्यानंतर या समाजाला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यासाठी कोण जबाबदार आहे, त्यालाही मीच जबाबदार आहे काय, असे ते म्हणाले. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, त्याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला. 2024 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असेल, तर एक चेहरा निवडण्यावर वेळ घालवण्यापेक्षा संसदेत लक्ष केंद्रीत करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

भाजपची बी टिम असल्याचा आरोप तुमच्यावर होतो, यावर ओवैसी म्हणाले, आपण अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला लागलो, तर आपल्याला काम करणे कठीण होईल, असे ते म्हणाले. मुस्लीमांना हक्क हवे असतील, तर मुस्लीम नेते असायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. सेक्युलर पक्ष मुस्लीमांना प्रतिनिधीत्व देत नाहीत. आता भाजपकडून एकही मुस्लीम नेता लोकसभा, राज्यसभेत नाही. त्यांना आता मुस्लीम मतांची गरज नाही. त्यांना फक्त हिंदूची मते हवी आहेत. आपल्यावर आरोप करणे हेच त्यांचे काम असून जमतेसाठी काम करणे हेच आपले ध्येय असल्याचे ओवैसी म्हणाले.