
छोटे कुटुंब म्हणजे देशभक्तीच. हिंदुस्थानातील लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने भविष्यात युवा पिढीला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणातून देशवासीयांना केले. यावर एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी ट्विटरवरून हल्ला चढवला. देशातील वाढत्या युवाशक्तीचा वापर कसा करायचा हे मोदींना माहीत नाही. त्यामुळेच ते सरकारच्या जुन्या आणि कालबाह्य झालेल्या संकल्पना पुन्हा मांडत आहेत. अशा प्रकारे ते आपली जबाबदारी झटकत आहेत, असा आरोप ओवेसींनी केला आहे.
पंतप्रधानांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात देशात तरुणांची संख्या प्रचंड वाढत आहे, परंतु याचा फायदा आपल्याला 2040 मध्ये होईल. असे असले तरीही वाढती लोकसंख्या देशासाठी चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. मूल जन्माला घालण्याआधी त्याचे संगोपन आपण योग्य प्रकारे करू शकू की नाही याबाबत संबंधितांनी विचार करायला हवा याकडेही मोदींनी लक्ष वेधले होते.
भाजप नेत्यांकडून मोदींची स्तुती
मोदींच्या भाषणाची भाजप नेत्यांनी स्तुती केली आहे. हे भाषण देशवासीयांसाठी प्रेरणादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नव्या हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेले कुटुंब नियोजनाचे आवाहन अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या दिशेने झेप घेतल्याची प्रतिक्रिया भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही मोदींच्या भाषणाची प्रशंसा केली असून लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा बनवण्यासाठीचे विधेयक लोकसभेत सादर करणाऱया सिंह यांचे सहकारी संजीव बाल्यान यांचा फोटोही गिरिराज यांनी ट्विट केला आहे.


























































