
आसाम-मिझोराम सीमाभागात दोन गटांच्या आपापसातील हिंसाचारामुळे तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आसाम आणि मिझोराममध्ये सीमेवरून वाद आहेत. त्यावरूनच आसामच्या कछार जिल्ह्यातील लायलपूर येथे शनिवारी संध्याकाळी आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील गटांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात दोन्ही गटांमधील अनेक जण जखमी झाले. दरम्यान या दोन्ही राज्यांच्या सीमाभागासह लायलपूर परिसरात काही दंगेखोरांनी घरांना आग लावली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आसाम राज्य सरकारने सुरक्षा दलांना आसामच्या कछार जिल्ह्यात आणि मिझोरामच्या कोलासिब जिल्ह्यात तैनात केलं आहे.
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमाभागातील नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. काही मतभेद असतील तर ते बोलून सोडवले पाहिजेत, हिंसाचार उपयोगी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.


























































