
आसामचा कारभार नागपूर आणि आरएसएसचे चड्डीवाले चालवणार नाहीत. आसामची जनताच आसामचा कारभार हाकेल, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. देशात पुन्हा नोटाबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्रही राहुल गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर सोडले.
काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आज शनिवारी गुवाहाटीत आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आसाममधील संस्कृती, भाषा आणि इतिहासावर संघाचे आक्रमण होऊ देणार नाही असे मोदी सरकारला ठणकावून सांगायला हवे. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यायला हवे, असेही राहुल यावेळी म्हणाले. आसाममधील जनतेला एकमेकांसोबत लढण्यासाठी प्रवृत्त करायचे हेच भाजप सरकारचे लक्ष्य असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. भाजपचे नेते जिथे जातात तिथे द्वेष पसरवतात, परंतु आसाम द्वेष घेऊन नाही तर एकमेकांसोबत, एकमेकांना प्रेम देत प्रगतिपथावर जाईल अशी भावनाही राहुल यांनी यावेळी व्यक्त केली.
तुमच्या आवाजाला ते घाबरतात, तुमचा आवाज दाबू पाहतात
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी, जीएसटी लादून संपूर्ण अर्थव्यवस्थेची पार वाट लावून टाकल्याचा आरोप करताना सरकारने आतापर्यंत किती तरुणांना रोजगार दिला, असा सवालही राहुल यांनी मोदी सरकारला केला. देशातली युवाशक्ती सैरभैर झाली आहे, आसाममध्ये आंदोलन सुरू आहे. या तरुणांवर गोळीबार होत आहे. त्यांचा आवाज भाजपला ऐकायचाच नाही. तुमच्या आवाजाला सरकार घाबरते, तो आवाज ते दाबू पाहत आहे, असा आरोपही राहुल यांनी केला.



























































