आशा सेविकांच्या मानधनात वाढ, स्वयंसेविकांना 2 हजार, गटप्रवर्तकांना 3 हजार रुपये वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीतही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत आपले कर्तव्य चोख बजावणार्‍या अशा सेविकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. आशा स्वयंसेविकांना दरमहा 2 हजार रूपये तर गट प्रवर्तकांच्या मानधनात 3 हजार रूपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाने राज्यातील 65 हजार 740 आशासेविकांना याचा लाभ होणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावात महाराष्ट्रातील 65 हजार आशा स्वयंसेविका सर्व खेड्यापाड्यांत तसेच शहरांमधील दाट लोकवस्त्यांत आतपर्यंत जाउन संशयित रूग्णांचा शोध घेत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:चा जीवही धोक्यात घातला. त्यांच्या या कामामुळेच कॉण्टॅक्ट ट्रेसिंग सर्वेक्षणात आपण यशस्वी ठरल्याचे राजेश टोपे म्हणाले. त्यांना मानधनवाढ देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यात लक्ष घालण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मानधनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 170 कोटी रूपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. 1 जुलैपासून ही मानधनवाढ लागू होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.