आषाढी उपवास स्पेशल

2418

सामना ऑनलाईन। मुंबई

एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हटलं जातं. यामागचा गंमतीचा भाग सोडला तर हे मात्र खरं आहे कि उपवासाच्या दिवशी आपण जरा जास्तच खात असतो. उदा. साबुदाण्याची खिचडी नुसतीच न खाता त्याबरोबर वेफर्स येतातच. दही, चिप्स, चिक्की, केळी,सफरचंदही जोडीला असतातच. पण हे सगळे पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे पोट गच्चं होत. कधी कधी दुखायलाही लागतं. हे टाळायचं असेल तर उपवासाचे एवढे सगळे पदार्थ एकत्र खाऊ नयेत. त्याऐवजी एकाच वेळी खाल्ल्यावर तुमचे पोट भरेल असे पदार्थ खावेत.

varicha-bhat-1

वरीचा भात-शेंगदाण्याची आमटी

साहित्य…१ वाटी वरी, दोन चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, दोन वाट्या पाणी.

कृती…सर्वप्रथम वरी पाण्यातून काढून ताटात निथळत ठेवा. एका पातेल्यात तूप गरम करुन घ्या. तूप गरम झाले कि त्यात जिरे टाका. जिरे तडतडले कि त्यावर वरी टाका. नीट परतून घ्या. नंतर त्यात पाणी ओता व मीठ टाकून मंद आचेवर हा वरीचा भात शिजवून घ्या.

शेंगदाण्याची आमटी

साहित्य... दीड कप शेंगदाण्याचा कूट, ३ कप पाणी, २ चमचे तूप, मीठ चवीनुसार, २ लहान चमचे साखर, २-३ आमसुलं, एक चमचा जिरे, २ हिरव्या मिरच्या, ३ चमचे ओलं खोबरं.

कृती...कूट पाण्यात एकजीव करा. त्यात साखर, मीठ, ओलं खोबरं, आमसुलं घाला. उकळ काढा. दुसरीकडे कढईत तूप गरम करा. त्यात मिरची टाका, नंतर जिरे टाका व आमटीला फोडणी घाला.

upwas-vada-1

उपवासाचा बटाटा वडा
सारणासाठी साहित्य…१ किलो उकडलेले बटाटे, किसलेले १ कच्चा बटाटा किंवा रताळे , हिरव्या मिरच्या चवीनुसार, साखर २ चमचे, एका लिंबाचा रस, एक वाटी शेंगदाण्याचे कूट, १ खवलेला नारळ, अर्धा इंच आल्याचा तुकडा.

आवरणासाठी साहित्य…

एक वाटी राजगीरा पीठ, एक वाटी शिंगाडा पीठ, अर्धी वाटी साबुदाणा पीठ

कृती…प्रथम हिरव्या मिरच्या, आले, जिरे वाटून घ्या, बटाटे सोलून घ्या. सारणाचे सर्व साहीत्य एकजीव करुन घ्या. तळहातावर बटाट्याचे गोल खोलगट कप बनवा. त्यात सारण घालून बटाट्याच्या वड्याप्रमाणे गोल आकार द्या. त्यानंतर आवरणासाठीचे पीठ पाणी टाकून एकत्र करा. भज्याच्या पीठाप्रमाणे घट्ट भिजवा. त्यात सारण भरलेला बटाटा बुडवा. सर्वबाजूने पीठ लागले कि गरमागरम तेलात हा वडा खरपूस तळा.

ratala-chakali

रताळी आणि वरीच्या चकल्या

साहित्य…एक वाटी वऱी, ५ हिरव्या मिरच्या, एक इंच आलं, चवीनुसार मीठ, ३ उकडलेली रताळी

कृती...रताळी उकडून व सोलून घ्यावीत. नंतर किसावीत. त्यात वरी टाकावी. आलं मिरच्या वाटून टाकावं, मीठ टाकावं. नंतर या पीठाच्या चकल्या कराव्यात.

keli-raita

केळीचा रायता

साहित्य...पिकलेली केळी ३, सुकलेलं खोबरं अर्धाकप, अर्धा लिंबाचा रस, १ कप दही, १ चमचा बारीक कापलेले बदाम.

कृती...खोबरं भाजून घ्या.केळ्याचे बारीक काप करा. त्या कापांना लिंबांचा रस लावा. कापांमध्ये दही, खोबरं,बदाम टाका. उपवासाचा झटपट रायता.

आपली प्रतिक्रिया द्या