
>> आशिष निनगुरकर, [email protected]
राग येणं ही गोष्ट आपल्या हातात नसली तरी सरावाने रागावर नियंत्रण आणणे शक्य होते. रागाच्या भरात आपण विचारशून्य होतो आणि विचारशून्यतेमुळे विवेक राहत नाही. तेव्हा विवेकबुद्धि शाबूत ठेवायची तर याबाबत स्वत:वर काम केलेच पाहिजे.
बदलती जीवनशैली, वाढती स्पर्धा आणि असुरक्षिततेमुळे आपल्या रागाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. अगदी किरकोळ कारणांवरून त्रागा करण्याच्या, हिंसाचार करण्याच्या घटना घडत आहेत. राग किंवा क्रोध हा आपला शत्रू आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. राग आल्यावर आपण एकाग्रता गमावतो. रागामुळे शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात. शरीराची लवचिकता कमी होते. स्वाभाविक गती नष्ट होते. रागाच्या भरात आपण विचारशून्य होतो. विचारशून्यतेमुळे विवेक राहत नाही. त्यामुळे योग्य-अयोग्यचा फरक जाणवत नाही. हा अनुभव सार्वत्रिक आहे.
राग येण्याची कारणे म्हणजे आपला स्वभाव. आपली गृहितकं. समज-गैरसमज. पूर्वग्रहदूषित मतं. अगदी खोलवर रुजलेली विचारसरणी. यासोबत आपल्या आवडीनिवडी आणि ज्या वातावरणात आपण वाढतो त्याचाही आपल्या व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम होतो. साहजिकच राग आणि संयमसुद्धा त्या वातावरणाची देणगी असू शकतात. मनाविरुद्ध घडणाऱया घटना, अपेक्षाभंग, स्वतःच्या चुका दुसऱयावर ढकलणे ही राग येण्याची सर्वात महत्त्वाची कारणे आहेत. आपल्या अवतीभोवती अशी खूप माणसं आहेत की, आपल्याला राग येतो, आपण थोडे रागीट आहोत हे मान्य करत नाहीत. जे स्वतः स्वीकारतच नाहीत, ती मंडळी रागातून बाहेर येण्यासाठी कसे प्रयत्न करतील?
रागाच्या भरात काहीबाही करून राग शांत झाल्यावर मोठी किंमत मोजण्यापेक्षा रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र थेरपी विकसित करावी. रागावर नियंत्रण मिळवण्याचे अनेकांनी अनेक उपाय सांगितले आहेत. राग आल्यास दीर्घ श्वास घ्यावा हा सुपरहिट फंडा मानला जातो. मनातल्या मनात शंभर मोजणे, रागातील कृतीनंतर होणाऱया परिणामांचा क्षणभर विचार करणे, तशी स्वतःला सवय लावणे, राग अनावर झाल्यास त्या ठिकाणाहून तातडीने लांब जाणे, नरमाईच्या भाषेत त्या मुद्दय़ावर चर्चा करणे हा मार्ग आपण स्वीकारू शकतो. आवडते छंद जोपासणे, सर्जनशील कार्यात व्यग्र राहणे लाभदायक ठरू शकते. बागकाम करणे, साफसफाई करणे यांसारख्या कामांमध्ये आपण व्यग्र राहू शकतो. संगीत ऐकणे, वाद्य वाजवणे यांसारखी कामे आपण करू शकतो.
राग हा साधारणपणे आरोग्याशी निगडित घटक आहे. तेव्हा परिस्थिती सकारात्मकपणे हाताळणे गरजेचे असते. अनियंत्रित राग आरोग्य आणि नाती दोन्ही बिघडवू शकतात. व्यायाम तणाव कमी करायला मदत करतो. परिणामी राग कमी येतो. एखाद्या गोष्टीचा तुम्हाला राग येतोय, असं वाटलं तर थोडं चालण्यासाठी किंवा धावण्यासाठी घराबाहेर पडा. कामाच्या तणावपूर्ण वेळेमध्ये छोटासा ब्रेक घ्या. थोडासा शांत वेळ तुम्हाला पुढे येणारा राग नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतो.
तुमच्यावर आरोप होणार असेल, तर त्याचा ताण अधिक वाढतो. अशा वेळी स्वतशी बोला. मुद्देसूद राहा. माफ करणं हे सर्वात श्रेष्ठ शस्त्र आहे. एखाद्या गोष्टीवरून लगेच रागवण्यापेक्षा हजरजबाबीपणा वापरत त्या परिस्थितीला पुढे ढकला, पण समोरच्या व्यक्तीची निंदा करू नका. त्यामुळे भावना अधिक दुखावण्याची शक्यता असते आणि परिस्थिती आणखीन बिघडते. जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा शरीराला आराम देण्याकडे भर द्या. श्वासाचे व्यायाम करा, गाणी ऐका. योग करा. रागावर नियंत्रण करणं अनेकांसाठी आव्हानात्मक असू शकतं. अशा वेळी इतरांची मदत घेणं, त्यांना दुखावण्यापेक्षा उत्तम पर्याय असेल.
युवावस्था ही अनेक संदर्भांत एक अत्यंत वादळी अवस्था असते. नात्यांसंबंधीचे कडूगोड अनुभव व त्यातून निर्माण होणारे हिंदोळे, व्यवसायासंबंधीचे तणाव व निर्णय, मागील पिढीशी सांधे जुळवून घेतानाची कुचंबणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आदर्श व मूल्यांविषयी मंथन, चिंतनातून आलेले आकलन यासंबंधीचे इतरांशी असलेले मतभेद त्यांना जगणे नकोसे करतात. या सर्वांमुळे आलेली मानसिक मरगळ, नकारात्मकता, टोकाची विफलता आणि हताशा युवकांना क्वचित आत्महत्येपर्यंतदेखील पोहोचवू शकते. डॉ. अब्दुल कलाम, डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश व विकास आमटे, डॉ. किरण बेदी यांच्यासारखे युवकांच्या आक्रोशाला समजून घेऊन शांतपणे दिशा देणारे मैत्र…आज हवे आहेत. असे मैत्र समाजात तर आहेत, पण प्रश्न आहे घराघरांमधून असे जिवलग कोण बनणार? आपल्या रागावर नियंत्रण कोण ठेवणार? कारण मन शांत ठेवून लढणारेच भविष्यकाळात युवा शक्तीला क्रांतीज्योत बनवू शकतात.


























































