छिंदम, कदमसारखी विकृती जोपासणारा पक्ष राज्याला काय देणार?

26

सामना प्रतिनिधी । नरसीफाटा

छिंदम आणि कदम यांच्यासारखी विकृती जोपासणारा भाजपासारखा राजकीय पक्ष महाराष्ट्राला कुठला विचार देणार असा जबरदस्त घणाघात करतांनाच सत्तेचा माज चढलेल्या मस्तवाल भाजपाची अन्यायी राजवट उलथवून टाकण्यास सज्ज व्हा, असे जोरदार आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

ashok-chavhan-01

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज नायगावात पोहोचली. यानिमित्ताने पार पडलेल्या जाहीर सभेला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

अशोक चव्हाण यांनी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सर्वच आघाडीवर अपयशी ठरलेल्या या अन्यायी राजवटीला हद्दपार करुन जनतेचा पाच वर्षाचा वनवास संपवणारच, असा निर्धारही चव्हाण यांनी व्यक्त केला. महापुरुषांबद्दल अपशब्द काढणारा नगरचा छिंदम व मुलींना पळवून आणण्याची भाषा करणारा आमदार राम कदम सारखी विकृती पोसणाऱ्या भाजपाला धडा शिकवण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. जनतेच्या हक्कासाठी व हितासाठी ही जनसंघर्ष यात्रा काढल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या