राज्य सरकारचे स्टिअरिंग उद्धव ठाकरे यांच्या हातात

1677

राज्यात सध्या तीन पक्षाचे सरकार असले तरी राज्य सरकारचे स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असून महाविकास आघाडीचे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

राज्यात सध्या तीन चाकांचे सरकार असल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे. या टिकेला अशोक चव्हाण यांनी एका खासगी टिव्ही चॅनेलशी बोलताना सडेतोड उत्तर दिले. महाराष्ट्रात सरकार तीन पक्षांचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्रीच आहेत. सरकार चालवण्याचे काम ते करीत आहेत. आम्ही आमचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडतो पण अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो. तो आम्हाला मान्य आहे असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

महाआघाडी सरकारमध्ये कुरबुरी असल्याच्या तक्रारी असल्याबाबत टीका होते आणि काँग्रेसकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले की, तीन पक्षांचे सरकार असल्याने काही मर्यादा येतात. तीनही पक्षांनी समजून घेणे गरजेचे आहे. अडचणी वाढल्यास आम्ही सांगतोही; पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मार्ग निघतो. तीन पक्षांचे सरकार असल्याने काही उणिवा असण्याची शक्यता आहे. त्या उणिवा दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रात शक्य नाही
काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, सध्या फडणवीसांची घुसमट होत आहे. राजस्थानमध्ये मनासारखे घडले नाही त्यामुळे महाराष्ट्रात काही तरी घडावे असे त्यांना वाटते. पण महाराष्ट्रात ते शक्य नाही. विरोधी पक्षांनी कितीही टीका केली तरी महाविकास आघाडीचे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल. देवेंद्र फडणवीस यांनी आता जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करावे असा सल्लाही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या