देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यामध्ये राजस्थानचाही समावेश असून इथे काँग्रेसची सत्ता आहे. या निवडणुकीत काँग्रेसला किमान 156 जागा मिळाव्यात हे लक्ष्य असून आम्ही त्या दिशेने वाटचाल करत असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतो, मात्र यावेळी असे होणार नाही, यावेळी काँग्रेस सत्ता राखण्यात यशस्वी होईल असे ते म्हणाले.
गेहलोत यांनी निवडणुकीसंदर्भात बोलताना म्हटले की, ‘1998 साली काँग्रेसला 156 जागा मिळाल्या होत्या आणि मी मुख्यमंत्री झालो होतो. आम्ही चांगली कामे केली आहेत, लोकांसाठी चांगल्या योजना आणल्या आहेत. लोकांमध्ये उत्साहाचे वातावारण आहे. आमचे लक्ष्य हे 156 जागा असून आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. आम्ही कुठे थांबू हे आता सांगणं कठीण आहे.’