
मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी कॅप्टन उर्फ अशोककुमार खरात याला नाशिक पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयाने आज त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. सुमारे 58 आक्षेपार्ह व्हिडीओ हस्तगत करण्यात आले असून, सखोल चौकशी सुरू आहे. राजकीय क्षेत्रातील बडय़ा हस्तींचे या घटनेमुळे धाबे दणाणले आहे.
विश्वशास्त्राचा अभ्यासक कॅप्टन उर्फ अशोककुमार खरात हा सर्वसामान्यांबरोबरच राजकीय नेत्यांचे भविष्य सांगतो अशी त्याची ख्याती आहे. त्याच्याकडे गेलेल्या एका महिलेला भूलथापा देऊन त्याने आपल्या जाळ्यात ओढले. गुंगीचा पदार्थ देवून तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने सरकारवाडा पोलिसात दिली. गुन्हे शाखेने तपास करून बुधवारी पहाटे खरातला बेडय़ा ठोकल्या. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत त्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संसार उद्ध्वस्त होण्याच्या भीतीने ती तक्रार देत नव्हती. कुटुंबातील व्यक्तीने आधार दिल्यानंतर तिने ही तक्रार दिली.
खरातच्या कार्यालय व घर झडतीत पोलिसांना पेनड्राईव्ह मिळाला असून, त्यात आक्षेपार्ह व्हिडीओ आहेत, त्याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
सखोल चौकशी करण्याची अंनिसची मागणी
राजकीय नेत्यांशी असलेले त्याचे संबंध पाहता हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव येण्याची शक्यता आहे, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.
सत्ताधारी नेत्यांशी संबंध
रुपाली चाकणकर यांनी पाय धुतले!
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरात याचे पाय धुवून पाद्यपूजा करीत असल्याचा व त्याच्यावर छत्री धरून उभ्या असल्याचे पह्टो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाकणकर या खरात याच्या मिरगाव येथील शिवनिका संस्थानवर ट्रस्टी असल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कामांच्या निमित्ताने ट्रस्टशी जोडले गेले पण पॅप्टन खरात यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. पोलीस यात निष्पक्ष चौकशी करतील, अशी ‘एक्स’ पोस्ट रुपाली चाकणकर यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी केली होती पूजाअर्चा
कॅप्टन खरात याला अनेक राजकीय नेते गुरू मानतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी खरात याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील देवस्थान ट्रस्टला भेट देऊन पूजाअर्चा केली होती. तेव्हा त्यांच्या सोबत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, दीपक केसरकर होते.





























































