आष्टी-नगर रेल्वेने घेतला पेट; कोणतीही जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आष्टी येथून नगरकडे जातांना नारायण डोहच्या पुढे असलेल्या नगर-सोलापूर हायवेवरील गेटजवळ अचानक नगर-न्यू आष्टी रेल्वेने अचानक पेट घेतला. या आगीत कोणतीही जीविहानी झाली नसून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

गेल्या वर्ष भरापासून नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे नगर-आष्टीपर्यंत काम पूर्ण झाले असून, नगर-न्यू आष्टी रेल्वेसेवा 23 सप्टेंबर 2022 पासून नियमित सुरू झाली आहे. ही रेल्वे नगरवरून सकाळी ७.४5 वा.निघते व न्यू आष्टी येथे 10.15 वा.येते त्यानंतर न्यू आष्टीवरून 11 वा.निघून दुपारी 2 वा.नगर येथे पोहचते. परंतु सोमवारी नगर येथूनच सकाळी 10.30 वा.गाडी सुटल्याने रूटींगप्रमाणे न येता रेल्वे लेट झाली. ही रेल्वे पुन्हा आष्टी येथून नगर येथे जात असतांना दुपारी 3.30 वा.नारायणडोहच्या पुढे गेल्यानंतर नगर-सोलापूर मार्गावरील गेट क्रॉस करतांना अचानक पुढील चार-पाच बोगीला आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली, यामध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नसून रेल्वे अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी नगर महापालिका कर्मचारी व नागरिकांनी प्रयत्न करून आटोक्यात आणली आहे.

एकही टिकीट विक्री नाही
सोमवार ते शनिवार नियमित नगर ते न्यू आष्टी रेल्वेसेवा सुरळीत सुरू आहे. परंतु दर रविवारी ही डेमो पुणे येथे साफसफाई व डिजेल भरण्यासाठी जाते. त्यामुळे सोमवारी ही रेल्वे वेळेवर न येता उशीरा येते. त्यामुळे सोमवारी न्यू आष्टी, कडा, न्यू धानोरा, सोलापूरवाडी, न्यू लोणी व नारायणडोह या रेल्वे स्टेशनवरून एकही तिकीट विक्री झाली नाही.