
>> प्रा. आशुतोष पाटील
वल्लभी विद्यापीठाचे उत्खनन हे भारताच्या प्राचीन शैक्षणिक इतिहासाचा शोध घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. गुजरातच्या भावनगर जिह्यातील वल्लभीपूर येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 2025 मध्ये केलेल्या आधुनिक उत्खननामध्ये आणि सॅटेलाईट मॅपिंगच्या साहाय्याने या प्राचीन शहराचे अवशेष सापडले आहेत.
प्राचीन काळातील मोठय़ा व्यापारी केंद्रांच्या ठिकाणी जैन व बौद्ध धर्माचा मोठा प्रसार झालेला दिसतो. यातूनच विविध ठिकाणी ज्ञानकेंद्रांची स्थापना झाली व विद्वान, चारित्र्यवान लोकांनी शिक्षणाचे कार्य हाती घेतले. काठेवाड म्हणजे सौराष्ट्र भागातील प्राचीन काळी मोठे व्यापारी केंद्र असलेले वल्लभी हेदेखील अशाच ज्ञानकेंद्रांपैकी एक होते. सध्या गुजरातमधील भावनगर जिह्यात असलेले वल्लभीपूर या ठिकाणी हे प्राचीन विद्यापीठ होते. आज हे विद्यापीठ व येथील मोठे शहर अस्तित्वात नसले तरी आजही तेथे अनेक तत्कालीन ताम्रपट, शिलालेख आणि मैत्रक राजांची नाणी सापडतात. गुप्तांच्या उत्तरकाळात या साम्राज्याची स्थापना झाली. राजा भट्टारक हा मैत्रक राज्याचा संस्थापक मानला जातो. त्यांचे राज्य हे बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र होते. थेरवाद विचाराचा त्यांच्यावर प्रभाव होता.
वल्लभी येथे प्रथम बौद्ध विहार हा राजा ध्रुव प्रथम याच्या बहिणीची कन्या असलेल्या राजकुमारी दुड्ड हिने इ.स. 477 मध्ये स्थापन केल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. त्यानंतर इ.स. 580 मध्ये राजा धरसेन याने आचार्य भाडंत स्थिरमती यांनी स्थापन केलेल्या श्री बाप्पापाडा विहारास उदार देणगी दिली. या विहाराने ज्ञानकेंद्र म्हणून मोठी कीर्ती मिळवली होती आणि त्याची तुलना नालंदा विद्यापीठाशीही केली जात असे. इ.स. 480 ते 775 या काळात वल्लभी हे मैत्रक राजवंशाची राजधानी होते. मैत्रक राजांच्या राजाश्रयामुळे या विद्यापीठाची विशेष भरभराट झाली. तसेच समुद्रकिनाऱयाजवळ वसलेले असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने वल्लभीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. नालंदा पाम शीला उदंतपुरी या विद्यापीठांप्रमाणेच वल्लभी विद्यापीठाची कीर्तीदेखील दूरवर पोहोचली होती. दूरच्या प्रांतातून अगदी गंगेच्या खोऱयातूनदेखील येथे शिकण्यासाठी विद्यार्थी येऊ लागले होते. या विद्यापीठात बहात्तरहून अधिक विषय शिकवले जात असत. याच काळात वल्लभीमध्ये जैनांनीही आपले स्थान मिळवले होते. इ. स. पूर्व तिसऱया शतकात जैन धर्मशास्त्रांना मान्यता मिळाली असली तरी हे शास्त्र लिखित स्वरूपात नव्हते, हे काम जवळ जवळ पुढे चार शतके चालू राहिले. या गोष्टीला सुरुवात मगध देशातील पाटलीपुत्र नगरीत झाली, पण पूर्ण मान्यता मात्र वल्लभी येथे इ.स. 454 साली भरलेल्या सभेने दिली. या वेळी वल्लभी येथील मुख्य आचार्य देवद्धीरज्ञानी होते. वल्लभी येथील सभेने जैन धर्माचे 84 ग्रंथ मान्य केले. यात 41 सूत्रे, 30 प्रकीर्ण, 12 नियुक्ती व 1 महाभाष्य यांचा समावेश होतो. जैन परंपरेप्रमाणे आयोजित केली जाणारी दुसरी जैन परिषद वल्लभी येथे आयोजित केली गेली होती. हे ग्रंथ संस्कृतमध्ये न लिहिता ते तत्कालीन जनसामान्याला समजेल अशा अर्धमागधी भाषेत लिहिण्यात आले होते.
वल्लभी विद्यापीठातील अभ्यापामात जैन, बौद्ध सांप्रदायाचे व्यापक शिक्षण देण्याची सोय होती. या विद्यापीठातून एकूण 72 विषय शिकवण्यात येत. त्यात लेखनकला, गणित, गायन, नृत्य, वाचन, वादन, व्याकरण, वृत्तांचे ज्ञान, ज्योतिषशास्त्र, ध्वनिशास्त्र, उत्पत्तीशास्त्र, संस्कारशास्त्र, शब्दशास्त्र, पाने कापणे वगैरे, सौंदर्य वाढेल या पद्धतीने नखे कापण्याची कला, रत्नपरीक्षा, शस्त्रांचे ज्ञान, गजारोहणम, तुर्गरोहणम, धनुर्विद्या, मंत्रांचे ज्ञान, यंत्रवाद, रसवाद, खाणींचे शास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान, तर्कशास्त्र, सिद्धांत, विषवाद, सर्पांचे विष उतरवण्याचे ज्ञान, पक्षांच्या उडण्यावरून आणि आवाजावरून शकुन-अपशकून सांगणे, वैद्यकीय शास्त्र, आचार्य विद्या, आगम, वास्तुशास्त्र, हस्तरेखा ज्ञान, कायदेशास्त्र, पुराण, इतिहास, वेद, विधी, विज्ञानवाद, तत्त्वज्ञान, योगविद्या, अघोरीविद्या, जादूची कला, गूढ ज्ञान, फसवेगिरीची कला, संस्कृत, प्राकृत, अर्थशास्त्र, अपभ्रंशम, कपट, देशीभाषा, इत्यादी विषय या विद्यापीठात शिकवण्यात येत असत. हे 72 विषय ऐच्छिक विषयात मोडत असत. ज्या विद्यार्थ्यांना जो विषय आवडे तो शिकवण्यात येत असे. इतर विषय शिकण्याची सक्ती त्यांच्यावर नसे. अशा प्रकारे व्यापक शिक्षण देण्याची सोय वल्लभी, तक्षशिला, नालंदा यांसारख्या प्राचीन विद्यापीठातून केली होती.
वल्लभी विद्यापीठाचे उत्खनन हे भारताच्या प्राचीन शैक्षणिक इतिहासाचा शोध घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. गुजरातच्या भावनगर जिह्यातील वल्लभीपूर येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (Aएघ्) 2025 मध्ये केलेल्या आधुनिक उत्खननामध्ये आणि सॅटेलाईट मॅपिंगच्या साहाय्याने या प्राचीन शहराचे अवशेष सापडले आहेत. नुकत्याच झालेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, इसवी सन 300 ते 800 दरम्यान हे शहर विद्येचे एक जागतिक केंद्र होते. उत्खननादरम्यान येथे मोठय़ा प्रमाणात टेराकोटा सील्स (मुद्रा), ब्राह्मी लिपीतील शिलालेख, मातीची भांडी आणि बौद्ध विहारांचे अवशेष सापडले आहेत. विशेषत मॅत्रक वंशाच्या काळात भरभराटीला आलेल्या या विद्यापीठाचा विस्तार आजच्या आधुनिक वल्लभीपूर शहराच्या जमिनीखाली गाडला गेला असल्याचे नव्या उपग्रहीय प्रतिमांतून दिसून आले आहे.
भारतात आलेल्या चिनी प्रवाशांच्या प्रवासवर्णनामुळे आपल्याला तत्कालीन विद्यापीठांची बहुमोल माहिती मिळते, त्याच्या आधारे आज आपण विद्यापीठांचा इतिहास समजून घेतो. विशेषत ह्युएन सांग आणि इ त्सिंग या दोन्ही प्रवाशांच्या नोंदीत वल्लभी हे शहर फारच भरभराटीस आलेले समृद्ध शहर होते असा उल्लेख सापडतो. ह्युएन सांग लिहितो की, ‘हे अतिशय प्रसिद्ध बंदर होते व येथून माल बाहेर पाठवला जात असे व बाहेरून माल येथे येत असे. सातव्या शतकात इतके प्रसिद्ध दुसरे बंदर जगाच्या पाठीवर नव्हते. अत्यंत दुर्मिळ व किमती वस्तू येथून निर्यात होत.’ या विधानावरून सौराष्ट्रातील या प्रसिद्ध शहराच्या समृद्धीची कल्पना येते. सातव्या शतकाच्या मध्यात ह्युएन त्सांगने येथे भेट दिली तेव्हा वल्लभीमध्ये सहा हजार बौद्ध भिक्षू शिक्षण घेत होते. शंभराच्या वर बौद्ध विहारातून भिक्षू येथे शिक्षणासाठी येत. इ त्सिंग हा प्रवासी वल्लभी बद्दल लिहितो की, ‘संस्कृती, शिक्षण व आचार्यांबद्दल नालंदा जीतकी मान्यता पावली तितकीच मान्यता वल्लभीनेसुद्धा मिळवली. वल्लभी येथेसुद्धा नालंदा इतकेच श्रेष्ठ प्रतीचे शिक्षण दिले जात असे. इ त्सिंगने वल्लभीची तुलना केवळ नालंदाशीच नाही तर चीनमधील चिम्मा, शीचू, लुगमेन, चुली वगैरे प्रसिद्ध विद्यापीठांशी केलेली आहे व या विद्यापीठांइतकीच वल्लभीसुद्धा श्रेष्ठ आहे, जेथे येथे बौद्ध व जैन या दोन्ही धर्मांचा सखोल अभ्यास केला जाई व त्यासाठी दूरहून अभ्यासक येथे येत असत. मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्ध असलेले हे ज्ञानकेंद्र बराच काळ तग धरून राहिले. पण आाढमणांनी पुढे त्याचे अस्तित्व हिरावून घेतले. 12 व्या शतकानंतर या विद्यापीठाचे काय झाले याची फारशी माहिती मिळत नाही.
(लेखक पुरातत्त्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)





























































