
टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माची बॅट Asia Cup 2025 चांगलीच तळपताना दिसत आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर-4 च्या लढतीत त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत त्यांचा माज उतरवला. 39 चेंडूंमध्ये 74 धावांची तुफानी खेळी करत त्याने पाकड्यांच्या नांग्याच ठेचून काढल्या. या सामन्यात त्याने 6 चौकार आणि रॉकेटच्या वेगाने 5 खणखणीत षटकार ठोकले. सध्याच्या घडीला तो आशिया चषक 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. याचबरोबर त्याने आता षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माची बरोबरी केली आहे.
Asia Cup च्या टी-20 फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये हिटमॅन रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 9 सामन्यांमध्ये 12 षटकार ठोकले आहे. मात्र, अभिषेक शर्माने फक्त 4 सामन्यांमध्येच 12 षटकार ठोकून सर्वांनात आश्चर्याचा धक्का दिला आहे. पाकिस्ताविरुद्ध त्याने 5 षटकार ठोकून रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. आता पुढील बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अभिषेकच्या बॅटवर सर्वांच्या नजरा असणार आहे. कारण एक षटकार खेचताच तो Asia Cup च्या टी-20 फॉरमेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणार हिंदुस्थानी खेळाडू ठरेल. सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (11 षटकार) आणि तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव (10 षटकार) या खेळाडूंचा समावेश आहे.
आशिया चषकामध्ये अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी केली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये त्याने 43.25 च्या सरासीने आणि 208.43 च्या स्ट्राइक रेटने 173 धावा चोपून काढल्या आहेत. यामध्ये 17 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश आहे. याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा पी निसांका आहे त्याने 4 सामन्यांमध्ये 146 धावा केल्या आहेत.


























































