
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण तापले असले तरी आगामी आशिया कपचा कार्यक्रम आणि स्पर्धेचे ठिकाण जाहीर झाले असून हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हे क्रिकेटयुद्ध 14 सप्टेंबरला दुबईच्या स्टेडियमवरच खेळविले जाणार आहे. हिंदुस्थानात या सामन्याबाबत प्रचंड विरोध असतानाही निव्वळ आर्थिक लाभ उठवण्यासाठी खेळलेली चाल यशस्वी करण्याचा प्रयत्न राजकीय पातळीवर केला जात असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी क्रिकेटवेडे तेथे पोहोचतात. या सामन्याची आर्थिक उलाढाल अब्जावधींमध्ये असल्यामुळे या सामन्याचे लोणी लुटण्यासाठी सर्वच आयोजक नेहमीच तयार असतात. त्यामुळे काहीही करून हा सामना मैदानात साकारण्यासाठी क्रिकेटबरोबर राजकीय क्षेत्रातील अदृश्य शक्तीसुद्धा आपली ताकद लावतात, याची सर्वांना कल्पना आहे. आताही तोच प्रकार घडत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
या वर्षीचा आशिया कप 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे होणार असून दुबई व अबूधाबी या दोन प्रमुख मैदानांवर एकूण 19 सामने खेळवले जाणार आहेत. त्यात 11 सामने दुबईत आणि उर्वरित 8 सामने अबूधाबीमध्ये खेळवले जातील. साखळीतील सर्वात मोठा सामना 14 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. एवढेच नव्हे तर या दोन संघांमध्ये 21 सप्टेंबरला सुपर पह्रमध्ये पुन्हा गाठ होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास 28 सप्टेंबरलादेखील दुबईतच खेळवली जाऊ शकते. त्यामुळे एकाच स्पर्धेत हे क्रिकेटयुद्ध तीनदा पेटण्याची शक्यता आहे. या लढतीबरोबर हिंदुस्थानातील राजकीय वातावरणही पेटणार हे निश्चित आहे.