आशिया कपपूर्वी बुमरा-सिराजची ‘अग्निपरीक्षा’, फिटनेस चाचणीनंतरच बीसीसीआय घेणार निर्णय

जो फिट असेल तोच संघात बसेल, हे धोरण बीसीसीआय आगामी स्पर्धांसाठी आजमवणार असून, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराजच्या फिटनेसवर बीसीसीआयने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आशिया कपपूर्वी या दोन्ही गोलंदाजांना फिटनेसची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या सहभागाबाबत बीसीसीआय घोषणा करील. तसेच संघातील अन्य खेळाडूंनाही याच परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमरा केवळ तीन कसोटी खेळला होता, तर सिराजने पाचही कसोटीत स्वतःचा वेगवान मारा इंग्लिश फलंदाजांना दाखवला होता. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आशिया कपपूर्वी निवड समितीची बैठक होणार आहे. त्याआधी या दोघांच्या फिटनेसचे परीक्षण केले जाणार आहे. या एक महिन्याच्या विश्रांती कालावधीत दोघांची पूर्णपणे फिटनेस पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल. हे दोघेही संघासाठी महत्त्वाचे असून दोघांनाही फिट करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. आशिया कपमध्ये हिंदुस्थानचा सलामीचा सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध असेल. 28 सप्टेंबरला या स्पर्धेचा फैसला लागणार असून त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटयुद्ध पेटणार आहे. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळविली जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणताही धोका न पत्करता वर्पलोड मॅनेजमेंटची बीसीसीआय अंमलबजावणी करणार आहे.