
>>डॉ. मंजिरी भालेराव
राजकुमार शोतोकुने त्याच्या काळात बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी जे काम केले त्यामुळे लोक त्याला दैवी अवतार समजू लागले. त्याचा एक संप्रदाय तयार झाला. नारा प्रांतातील इकारुगा गावामधील होर्यु-जी हे मंदिर शोतोकूच्या संप्रदायाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले.
जपानमध्ये मंदिर स्थापत्याची सुरुवात झाल्यानंतर आर्थिक आणि राजकीयदृष्टय़ा शक्तिशाली असणाऱया लोकांनी मंदिरे बांधायला प्रोत्साहन आणि लागेल तशी मदत द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये सुरुवातीला राजकुमार शोतोकु याचा मोठा सहभाग होता. नारा प्रांतातील इकारुगा गावामधील होर्यु-जी मंदिर हे त्यापैकीच एक आहे. राजकुमार शोतोकुने त्याच्या काळात बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी जे काम केले त्यामुळे लोक त्याला दैवी अवतार समजू लागले. त्याचा एक संप्रदाय तयार झाला. हे मंदिर शोतोकूच्या संप्रदायाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. त्यातील अनेक धार्मिक विधी इथे पार पाडले जाऊ लागले. त्यामध्ये शोर्यो-ए हा एक महत्त्वाचा समारंभ आहे. राजकुमार शोतोकूच्या स्मरणार्थ गागाकु (संगीत) आणि बुगाकू (मुखवटा घालून नृत्य) करण्याची परंपरा फक्त या मंदिरातच नव्हे तर राजकुमार शोतोकुने बांधलेल्या मइतर म्हणजे आसुकादेरा, शितेन्नोजी तसेच इतर अनेक मंदिरांमध्ये आजही साजरा होतो. 22 एप्रिल हा शोतोकुचा जन्मदिवस मानला जातो. त्या दिवशी तर हे नृत्य मोठय़ा उत्साहात केले जाते.
काळाच्या ओघात या परिसरात अनेक नवी सभागृहे बांधण्यात आली. शोतोकुच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही काळानंतर त्याला लोक बोधिसत्त्व कान्नोन म्हणजे अवलोकितेश्वर याचा अवतार समजू लागले. भारतातील महाकारूणिक बोधिसत्त्व अवलोकितेश्वर याची लोकप्रियता इ.स.च्या 1 ल्या शतकात खूप वाढली होती आणि भारताबाहेरही पसरली होती. चीन, कोरिया या देशांमध्ये तो गुआन यिन किंवा क्वान यिन या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे सर्व भक्तांचा तारणहार अवलोकितेश्वर जेव्हा चीनमध्ये लोकप्रिय झाला तेव्हा तो गुआन यिन किंवा क्वान यिन नावाचे स्त्रीरूप घेऊन! चीनमध्ये अनेक ठिकाणी स्त्राrरूपातील गुआन यिन किंवा क्वान यिनचे पुतळे पाहायला मिळतात. तसेच या बोधिसत्त्वाला 11 डोकी आणि हजार हात आहेत अशी कल्पनाही प्रसिद्ध झाली. आपल्या 11 डोक्यांनी सर्व दिशांना पाहून संकटात असलेल्या लोकांना हजार हातांनी मदत करू शकतो/शकते, हे लक्षात आल्यानंतर त्याची लोकप्रियता फार झपाटय़ाने वाढली. त्याच्या अनेक मूर्ती चीन, कोरिया आणि जपान या देशांमध्ये निर्माण झाल्या. या बोधिसत्त्वाचे जपानमधील नाव कान्नोन असे आहे. बौद्ध धर्म जपानमध्ये लोकप्रिय होताना बुद्ध आणि इतर देवदेवता यांचीही लोकप्रियता वाढली. संकटातून तारणारा देव म्हणून कान्नोनसुद्धा सगळीकडे पुजला जाऊ लागला. कान्नोन हे एक शुभसूचक नाव म्हणून अनेक ठिकाणी वापरले गेले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॅनन हे कॅमेरा इ. बनवणाऱया कंपनीचे नाव. आजही याची जपानमध्ये अनेक ठिकाणी पूजा होते, काही महत्त्वाच्या मंदिरांच्या स्थळी यात्राही काढल्या जातात. तर राजकुमार शोतोकु याला लोक या बोधिसत्त्व कान्नोनचा अवतार समजू लागले. आज तर होर्यु-जी मंदिर हे शोतोकु संप्रदायाचे प्रमुख केंद्र आहे.
‘युमेदोनो’ (स्वप्नातील सभागृह) ही इमारत राजकुमार शोतोकुच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ग्योशिन सोझू या विद्वान बौद्ध आचार्यांनी इ.स. 739 मध्ये शोतोकुच्या स्मरणार्थ बांधून घेतली. या इमारतीच्या सर्वोच्च भागात अस्थी करंडकाच्या आकाराचे एक रत्न बसवले आहे. अष्टकोनी आकाराच्या इमारती या जपानमध्ये स्मारक वास्तू म्हणून बांधल्या जात. त्यापैकी एक म्हणजे ‘युमेदोनो’ आहे. या इमारतीमध्ये गुझे किंवा कुसे कान्नोन नावाने ओळखली जाणारी अवलोकितेश्वराची कापराच्या झाडाच्या एकसंध लाकडापासून बनवलेली एक 179 से.मी. (म्हणजे 5 फूट 8 इंच) आकाराची सोनेरी रंगाचा मुलामा दिलेली मूर्ती आहे. ही मूर्ती म्हणजे स्वत: राजकुमार शोतोकुची प्रतिकृती आहे आणि भक्तांच्या दु:खांचे निवारण करण्याची शक्ती तिच्यात आहे, असे मानले जाते. इ.स. च्या 7 व्या किंवा 8 व्या शतकात तयार केलेली ही भव्य लाकडी मूर्ती आजही चांगल्या अवस्थेमध्ये आहे, कारण इतकी वर्षे तिथल्या भिक्षूंनी फारशी लोकांपुढे आणली नाही आणि तिचे जतन करून ठेवले. पण आता वर्षातून दोन वेळा वसंत आणि शिशिर ऋतुंमध्ये ती एक महिनाभर लोकांना पाहता येते.
होर्यु-जी संकुलात अजून एक अप्रतिम मूर्ती मिळाली आणि ती म्हणजे कुदारा कान्नोन नावाने प्रसिद्ध असलेली 209 से.मी. (6 फूट 8 इंच) उंचीची अवलोकितेश्वराची लाकडाची मूर्ती. अतिशय सडपातळ बांध्याची ही मूर्ती कापराच्या झाडाच्या लाकडापासून बनवली आहे. तिच्यावर लाखेचा लेप देऊन अजून रंगकाम केले होते. 1911 मध्ये या मूर्तीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी केलेला मुकुट सापडला. त्यावर अमिताभ या ध्यानी बुद्धाची प्रतिमा कोरलेली होती. अवलोकितेश्वराच्या मुकुटात नेहमी हाच बुद्ध दाखवला जातो. या संकुलात ‘शारिदेन’ (अस्थी ठेवण्यासाठी केलेले सभागृह) आणि ‘एदेन’ (चित्रांसाठी केलेलं सभागृह) अशा इमारतीसुद्धा आहेत. मुळात शोतोकुशी संबंधित वस्तू ठेवण्यासाठी जरी ‘शारिदेन’ तयार केलेले असले तरी 12 व्या शतकात याची पुनर्बांधणी झाली आणि आता तिथे खुद्द गौतम बुद्धाच्या अस्थी आहेत असे मानले जाते. ‘शरीर’ या शब्दापासून ‘शारिदेन’ हा शब्द तयार झाला आहे. शोतोकुने वयाच्या दुसऱया वर्षी एकदा प्रार्थना म्हणायला दोन्ही हात जोडले असता त्यातून या बुद्धाच्या अस्थी निर्माण झाल्या असे मानले जाते. एदेनमध्ये शोतोकुच्या आयुष्यावर आधारित काही चित्रे काढली होती. ती आता टोकियो येथील संग्रहालयात आहेत. याबाबतची उर्वरित माहिती आपण लेखाच्या पुढील भागातून जाणून घेऊ.
– [email protected]
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट
प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)


























































