मैदानात न उतरता हिंदुस्थानी बॉक्सरची विजयाची विक्रमी हॅटट्रीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जकार्ता

जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानचा आघाडीचा बॉक्सर विकास कृष्ण जायबंदी झाल्याने उपांत्यफेरीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला नाही. त्यामुळे हिंदुस्थानच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा तुटल्या. उपांत्यफेरीचा सामना न खेळल्याने विकासला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. परंतु मैदानात न उतरता देखील विकासने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

एशियन गेम्स २०१८: अॅथलेटिक्समध्ये पदकांची लयलूट

उपांत्यफेरीत विकासचा सामना कझाकिस्तानच्या अमानकुल अबिलखान याच्यासोबत होणार होता. परंतु या सामन्यापूर्वी हिंदुस्थानी पथकासोबत आशियाई क्रीडा स्पर्धेत गेलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘विकासच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली असून त्याला काही आठवड्यांचा आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.’

विकासचा विक्रम
विकासने सलग 3 आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला हिंदुस्थानी बॉक्सर आहे. विकासने 2010 मध्ये ग्वांग्झूमध्ये 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 2014 मध्ये इंचियोनमध्ये कांस्य पदकावर कब्जा केला होता.

दरम्यान, विकासने याच वर्षी गोल्ड कोस्टमध्ये आयोजिक कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. विकासने 2011 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. तसेच 2015 मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक आणि 2017 मध्ये ताशकंदमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.