आधी पित्याने जिंकले होते, आता पुत्राने मारली बाजी

नौकायनपटू परमिंदर सिंहने परुषांच्या क्वाड्रपल स्कल प्रकारात कांस्य पदक जिंकून 22 वर्षांपूर्वी पित्याने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. 23 वर्षांच्या परमिंदरने सतनाम सिंग, जाकर खान आणि सुखमीत सिंहच्या साथीने सहा मिनिटे 8.61 सेकंद वेळ देत कांस्यपदकावर हिंदुस्थानचे नाव कोरले. परमिंदरचे बाबा इंदरपाल सिंह यांनी 2002 साली बुसान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कॉक्सलेस प्रकारात कांस्य जिंकले होते. आज पदक जिंकल्यानंतर परमिंदरने आनंद व्यक्त केला. बाबांमुळेच मी या खेळात आलो आणि आज त्यांच्याच समोर त्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याचा खूप आनंद झाल्याचेही परमिंदर म्हणाला. इंदरपाल यांनी 2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्येही सहभाग घेतला होता. आता ते नौकायन पथकाच्या प्रशिक्षकांच्या संघात आहेत.

वुशूमध्ये पदक पक्के; बॉक्सिंगमध्ये आगेकूच

आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारी हिंदुस्थानने सहा पदकांची लयलूट केली असली, तरी वुशूमध्ये रोशिबिना देवी हिने आपल्या देशाचे आणखी एक पदक पक्के केले. बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानच्या निशांत देव, दीपक भोरिया या खेळाडूंनी आगेकूच केली. मात्र, वुशूमध्ये विक्रांत बलियानचे आव्हान संपुष्टात आले.

महिलांच्या वुशू स्पर्धेतील महिलांच्या 60 किलो वजनी गटात हिंदुस्थानच्या रोशिबिना देवीने कझाकिस्तानच्या एमान करश्यगा हिचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली. याचबरोबर तिचे एक पदक आता पक्के झाले आहे. मात्र, पुरुषांच्या वुशु स्पर्धेतील 65 किलो गटात हिंदुस्थानच्या विक्रांत बलियानचे आव्हान संपुष्टात आले. त्याला इंडोनेशियाच्या सॅमुअल मार्बुनने 2-1 फरकाने हरविले.

बॉक्सिंगमध्ये निशांत देवने 71 किलो गटात नेपाळच्या दीपेश लामाचा 5-0 गुण फरकाने पराभव केला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या निशांतने या स्पर्धेत अंतिम 16मध्ये प्रवेश केला. दीपक भोरियाने मलेशियाच्या मुहम्मद आरिफीन 5-0 गुणांनी धुव्वा उडविला. दीपकने सहज विजयाला गवसणी घालत आगेकूच केली. मात्र, हिंदुस्थानची महिला बॉक्सर अरुंधती चौधरीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तिला यजमान चीनच्या यांग लियूने चूरशीच्या लढतीत पराभूत करीत बाहेरचा रस्ता दाखविला.