सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मुदतवाढ नको; मंत्री अस्लम शेख यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारमध्ये निवृत्तीनंतर अधिकाऱयांना मुदतवाढ दिल्याने सेवेतील अधिकाऱ्यांवर अन्याय तर होतोच पण त्यांचे मनोधैर्यही खच्ची होते. यामुळेच सेवानिवृत्त अधिकाऱयांना मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

निवृत्तीनंतर विजयकुमार गौतम यांची जलसंपदा विभागात विशेष कार्यकारी अधिकारीपदी अलीकडेच नियुक्ती करण्यात आली. याशिवाय आर. ए. राजीव यांना मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण तर राधेशाम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात मुदतवाढ देण्यात आली. मोपलवार यांना निवृत्तीनंतर तीन वर्षे मुदतवाढ देण्यात आली. राजीव यांना आणखी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आहे. या अधिकाऱयांना मुदतवाढ दिल्याने किंवा त्यांची ठरावीक कालावधीसाठी पुन्हा त्याच पदांवर नियुक्ती केल्याने सेवेतील अधिकाऱयांवर अन्याय होतो याकडे अस्लम शेख यांनी लक्ष वेधले.