काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांच्या घरावर आसाम पोलिसांचा छापा, हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीवर केलेले गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांच्या घरावर आसाम पोलिसांनी छापा टाकला आहे. पवन खेरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. रिनिकी भुईया सरमा यांच्याकडे तिहेरी पासपोर्ट असून विदेशात त्यांची मालमत्ता असल्याचा आरोप पवन खेरा यांनी केला होता. यानंतर रिनिकी भुईया सरमा यांनी पवन खेरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आसाम पोलिसांचे पथक पवन खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले.

आसाम पोलिसांचे एक पथक मंगळवारी पवन खेरा यांच्या निवासस्थानी धडकले. त्यावेळी पवन खेरा हे आपल्या निवासस्थानी नव्हते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झाड़ाझडती घेत काही सामान आपल्यासोबत नेले, असे वृत्त ‘एबीपी न्यूज‘ने दिले आहे. याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पवन खेरा यांच्या घराबाहेर गर्दी करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, पवन खेरा यांच्या निवासस्थानावरील छाप्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला.

लोकहितासाठी मूलभूत प्रश्न विचारल्याबद्दल माझे सहकारी पवन खेरा यांना अटक करण्यासाठी पोलिसांची मोठी फौज तैनात करणे, हे सिद्ध करते की आसामचे मुख्यमंत्री अस्वस्थ, हताश आणि घाबरलेले आहेत.ही कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नसून सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. एक हुकूमशहा आपल्या अनेक काळ्या कृत्यांना उघड करणाऱ्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांना शांत करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे. जे लोक इतरांना धमकावतात, ते स्वतः घाबरलेले असतात आणि त्यांच्याकडे लपवण्यासारखे खूप काही असते. हे यावरही शिक्कामोर्तब करते की मुख्यमंत्र्यांना आता पराभव स्पष्ट दिसत आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

पवन खेरा यांनी 5 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेत हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट असल्याचा दावा केला होता. तसेच अमेरिकेमध्ये कंपनी आणि दुबईतही त्यांची मालमत्ता असल्याचा आरोप खरे यांनी केला होता.

हिमंता सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट, अमेरिकेत कंपनी, दुबईत मालमत्ता; काँग्रेसने पुरावेच दाखवले