
शेतकरी वीजबिल माफी, नवाब मलिक यांचा राजीनामा, प्रवीण दरेकर यांचा कथित बॅंक गैरव्यवहार, विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, एसटी कर्मचारी संप या मुद्द्यांनी गाजलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. दरम्यान, 18 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला मुंबईत सुरुवात होणार असल्याची घोषणा दोन्ही सभागृहात करण्यात आली.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्याचे जाहीर केले. या अधिवेशनात विधानसभेत एकूण 15 बैठका पार पडल्या असून या काळात सभागृहाचे रोज सरासरी कामकाज 7 तास 10 मिनिटे चालले. एकूण 6698 इतके प्रश्न तारांकित प्राप्त होते. त्यापैकी 696 प्रश्न स्वीकृत असलेल्या प्रश्नांपैकी सभागृहात 64 प्रश्न उपस्थित करण्यात आले. 3 अल्पसूचना प्राप्त होत्या. एकूण 1787 लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. विधानसभेत एकूण 13 विधेयक पुर:स्थापिक करण्यात आली तर विधान परिषदेत एकूण 15 बैठका पार पडल्या. प्रत्यक्षात 88 तास 37 मिनिटे कामकाज पार पडले. रोजचे सरासरी कामकाज 5 तास 53 मिनिटे पार पडले. एकूण 1755 तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यापैकी 775 प्रश्न स्वीकृत होते. 113 तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले. अतारांकित प्रश्न 122 उपस्थित करण्यात आल्याची माहिती विधान परिषेदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

























































