महापालिकेतील पालकमंत्री लोढांचे कार्यालय हटवा; विरोधक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी थाटलेल्या दालनाच्या मुद्दय़ावर विरोधक आज विधानसभेत आक्रमक झाल्याचे दिसले. पालकमंत्र्यांनी पालिकेतील दालनावर कब्जा केला आणि आता तिथे भाजपच्या माजी नगरसेवकांनाही उठबस करण्याची मुभा दिली. हे अत्यंत चुकीचे असून मग सर्वच माजी नगरसेवकांची महापालिकेतील कार्यालये उघडी करा, अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली.

काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. पालकमंत्र्यांनी महापालिकेत दालन थाटण्याचा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. कालच त्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांची यादी जाहीर करून त्यांनाही त्या दालनात बसण्याची मुभा दिली आहे. असे असेल तर इतर पक्षाचेही माजी नगरसेवक आहेत. त्यांनाही महापालिकेत बसण्यासाठी जागा असली पाहिजे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे, ते काही मिनी मंत्रालय नाही, तिथे असा कब्जा गाजवणे योग्य नाही, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पालकमंत्र्यांवर त्या संबंधित जिह्याची जबाबदारी असते आणि सरकार व महापालिकेत योग्य समन्वय असण्यासाठी कार्यालय देणे चुकीचे नाही असे सांगत महसूलमंत्री विखे-पाटील यांनी लोढा यांच्या कृतीचे समर्थन केले. त्यावर काँग्रेस सदस्य अधिकच आक्रमक झाले. आमदार नाना पटोले यांनी स्वायत्त संस्थेमध्ये दालन बळकावणे म्हणजे यंत्रणेला डॅमेज करण्याचा प्रकार आहे, असा आरोप केला. पालकमंत्री हे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तालयात कार्यालय उघडू शकतात, पण महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद या स्वायत्त संस्था आहेत. पालकमंत्री महापालिकेत जास्त वेळ थांबत नसले तरी माजी नगरसेवकांची मात्र तिथे वर्दळ असते, असे पटोले म्हणाले. तालिका अध्यक्षांनी पुढील लक्षवेधी पुकारली तरीही काँग्रेस सदस्यांचा या मुद्दय़ावरून गदारोळ सुरूच राहिला. त्या गदारोळातच लक्षवेधीवर चर्चा उरकण्यात आली.

आयुक्तांना शिवसेना स्टाईलने जाब विचारणार
पालिका मुख्यालयातील पालकमंत्र्यांचे कार्यालय म्हणजे भाजपच्या माजी नगरसेवकांसाठी कुरण निर्माण करून दिले आहे आणि पालकमंत्री स्वतःचा बिल्डरचा व्यवसाय या कार्यालयातून करीत आहे. या सर्व प्रकाराबद्दल मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार हे पालिका आयुक्तांना शिवसेना स्टाईलने जाब विचारतील, असा इशारा आमदार सुनील प्रभू यांनी दिला.

महापालिकेच्या दीडशे वर्षांच्या कालावधीत पालकमंत्र्यांचे कार्यालय पालिकेच्या मुख्यालयात नव्हते. राज्यातील ईडी सरकार सतत पालिका प्रशासनावर दबाव आणून एक एक गोष्टी करून घेत आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे. आम्ही याबाबत अधिवेशनातही हा प्रश्न मांडला होता, पण सरकारकडून उत्तर दिले जात नाही. प्रश्न विचारल्यावर आमचा माईक बंद पाडला जातो. पालकमंत्री हे व्यवसायाने बिल्डर आहेत. या कार्यालयातून ते स्वतःचा व्यवसाय करतात. त्यांच्या विकासाचे काम ते करतात. आयुक्त सरकारच्या दबावाखाली आहेत. कार्यकाल पूर्ण होईपर्यंत आयुक्तांना या ठिकाणी थांबायले आहे. म्हणून सरकार सांगेल तसे आयुक्त ऐकतात. त्यामुळे हे अधिवेशन संपल्यावर मुंबईतील शिवसेनेचे आमदार पालिका मुख्यालयावर धडकतील आणि आयुक्तांना शिवसेना स्टाईलने जाब विचारतील, असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला.