
विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरील सदस्यांच्या हलक्याफुलक्या भाषणामुळे सभागृहातील ताण काही काळासाठी हलका झाला. पत्रिकेतील दशमग्रहापासून ते लाडका जावई अशी साखरपेरणी करीत सर्वपक्षीय सदस्यांनी आपल्याला झुकते माप देण्याची विनंती नवनिर्वाचित अध्यक्षांकडे केली.
नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत. हा धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पु. ल. देशपांडे यांच्या वाक्याचा दाखला दिला. ते म्हणाले की, पु. ल. म्हणायचे की, जावई व सासऱयाचे एकमत होणे कठीण आहे. जावई हा सासऱयाच्या पत्रिकेतील दशमग्रह आहे. पुलंनी असे म्हटले असले तरी राहुल नार्वेकर यांचे सासऱयांवर प्रेम आहे. काळजी करू नका, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही तुफान टोलेबाजी केली. तुम्ही आमचे जावई आहात. त्यामुळे तुम्ही सासरच्या मंडळींकडे जास्त लक्ष ठेवा. नाहीतर आम्ही आमच्या मुलीला सांगू, असे जयंत पाटील म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. रामराजे नाईक-निंबाळकर यांची विधान परिषद सभापतीची मुदत येत्या 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे ते पुढे कायम राहणार की नाही याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील उद्देशून म्हणाले, वरच्या सभागृहात सासरे सभापती आणि खालच्या सभागृहात जावई अध्यक्ष असा एक दुर्लभ योग आलेला आहे. जावई हा सासऱयाच्या कुंडलीत दशम स्थानी मानला जातो. मात्र हे स्थान किती चांगले आहे हे दाखवून देण्यासाठी आणि अंधश्रद्धा निकाली काढण्यासाठी सरकारने रामराजे नाईक-निंबाळकर यांना पुढील एक वर्ष तरी सभापतीपदावर कायम ठेवावे, असे सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नार्वेकर यांचे राष्ट्रवादी परिवाराशी जावयाचे नाते असल्याचे सांगत चांगलीच टोलेबाजी केली. आमच्याकडे असताना आम्ही त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवरही पाठविले. आता त्यांनी सासरच्या मंडळींचा हट्ट पुरवावा आणि त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आमच्याकडे जास्त लक्ष द्यावे, असे अजित पवार म्हणाले.
बुद्धिबळ आणि अमित शहा
विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनाची भाषणे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार छगन भुजबळ हातातील मोबाईल दाखवत राहिले आणि मला आत्ताच एक मेसेज आलाय की, जागतिक कीर्तीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी अमित शहा यांच्यासोबत बुद्धिबळ खेळण्यास नकार दिला आहे. कारण अमित शहा हे कुठच्या तंगडय़ा कुठे टाकतात आणि काही मोहरे असे फिरवतात की मी त्यांच्यासोबत बुद्धिबळ खेळूच शकत नाही असे विश्वनाथन आनंद म्हणतो, असे भुजबळ यांनी सांगताच सभागृहात हशा उसळला.






























































