
राष्ट्रवादीचे सदस्य जयंत पाटील यांचे निलंबन तसेच विरोधकांना बोलू न देता पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठरावाचे पत्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना दिले आहे. या पत्रावर सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील आदींसह सुमारे 39 सदस्यांच्या स्वाक्षऱया असल्याची माहिती आहे.
विधानसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलू दिले जात नाही. तर सत्ताधारी बाकावरील सदस्यांना झुकते माप दिले जाते अशी नाराजी मविआतील अनेक सदस्य सभागृहात बोलून दाखवित होते. या शिवाय राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी अध्यक्षांबद्दल काढलेल्या अनुद्गाराबद्दल त्यांना नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यत निलंबित करण्यात आले. या सर्व गोष्टींमुळे विरोधकांनी अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाचे पत्र दिल्याचे समजते.
यापूर्वी 5 मार्च 2018 रोजी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यावेळी नोटीसवर 38 आमदारांच्या सह्या होत्या.






























































