
दोन-तीन दिवस सलग पाऊस पडत असेल तर आपण वैतागतो. पाऊस, पाणी चिखल या वातावरणात कंटाळा येतो. मात्र, काही कोटी वर्षे पाऊस पडत असेल तर…आणि त्या पावसातून पाण्याऐवजी दगडगोटे आणि आगीचा वर्षाव होत असेल तर…याची कल्पनाही करता येत नाही. मात्र, आपल्या ग्रहमालेतील मंगळ ग्रहावर एकदोन नाही तर तब्बल 60 कोटी वर्षे लघुग्रहांचा पाऊस पडत होता, असा दावा नुकत्याच झालेल्या संशोधनातून करण्यात आला आहे.
नव्याने झालेल्या या संशोधनामुळे पुन्हा एकदा मंगळ ग्रहाचा नव्याने अभ्यास करण्याची गरज काही संशोधकांनी व्यक्त केली आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर असलेले अनेक मोठमोठे खड्डे या लघुग्रहांच्या वर्षावाने तयार झाल्याचे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. 60 कोटी वर्षे सातत्याने लघुग्रहांचा वर्षाव होत असल्याने मंगळाच्या पृष्ठभागावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांचा अभ्यास करून संशोधकांकडून ग्रहाचे वय आणि त्याच्याबाबातची इतर माहिती मिळवण्यात येते. नुकत्याच झालेल्या संशोधनाचा अहवाल अर्थ अँड प्लॅनेटरी साइन्स लेटर्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
या खड्ड्यांनाच क्रेटर असे म्हटले जाते. त्यांच्या निर्माणाची प्रक्रिया जटील असते. त्यामुळे मंगळावर गेलेल्या यानाद्वारे मिळालेली माहिती आणि आधीच्या संशोधनाचा आधार घेत याबाबतचा अभ्यास करण्यात आला. लघुग्रह वायुमंडळातून ग्रहावर आदळताना घर्षणाने वातावरणातच ते पेट घेतात. त्यामुळे आकाराने मोठे असलेले लघुग्रहच ग्रहापर्यंत धडकतात. मंगळावर असलेले अनेक खड्ड्यांवरून या ग्रहावर 60 कोटी वर्षे अनेक मोठ्या लघुग्रहांचा वर्षाव झाला असणार तसेच आगीचे अनेक लोळही ग्रहावर आदळले असणार, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
या नव्या संशोधनासाठी न्यू क्रेटर डिटेक्शन एल्गोरिदमच्या मदतीने मंगळावरील 521 खड्ड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील प्रत्येक खड्ड्याचा व्यास कमीतकमी 20 किलोमीटर आहे. तर 49 खड्डे हे 60 कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. तसेच याची निर्मिती सातत्याने झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे 60 कोटी वर्षे मंगळावर सातत्याने लघुग्रहांचा वर्षाव होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे नवे संशोधन याआधी झालेल्या संशोधनातील अभ्यासाला नवी दिशा देणारे आहे, असे ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटीतील संशोधक अँथनी लागेन यांनी सांगितले. हे खड्डे कमी कालावधीत निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, याची निर्मिती 60 कोटी वर्षांमध्ये झालेल्या लघुग्रहाच्या वर्षावाने झाल्याचे संशोधनातून स्पष्ट होत आहे. काही मोठ्या लघुग्रहांच्या टक्करीत हे खड्डे पडल्याचा अंदाज होता. मात्र, अशी टक्कर झाल्यास त्यातील वस्तू विरुद्ध दिशेला फेकल्या जातात. तसे यातून दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात लघुग्रहाच्या अनेक वर्षांच्या वर्षावानेच हे खड्डे निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधनातून मंगळ आणि चंद्राबाबत अधिक अभ्यासाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


























































