
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भारतरत्न व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे श्रेष्ठ वक्ता आणि भावनाशील कवी म्हणून ओळखले जात. त्यांची संसदेतील अनेक भाषणं गाजली आहेत. सरस्वती प्रसन्न असणाऱया अटलजींना स्मृतिभ्रंशाचा आजार झाला. आजारपणामुळे सक्रिय राजकारणातून बाजूला पडून अनेक वर्षे झाली, पण तरीही हिंदुस्थानी राजकारण आणि साहित्यातील त्यांचे स्थान तसूभरही कमी झाले नाही. आजही त्यांचे राजकारण, त्यांच्या कविता या राजकीय आणि साहित्य वर्तुळावर प्रभाव टाकून आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चौकटीबद्ध मुशीत जडणघडण झालेल्या अटलबिहारी यांच्या नेतृत्वाने हिंदुस्थानी राजकारणाचा तख्तपालट केला. देशाचे राजकारण आणि संसदेचे प्रदीर्घ काळ साक्षीदार राहिलेल्या अटलजींचा उत्तर प्रदेशवर विशेष जीव होता. आपल्या संसदीय कारकीर्दीत ते लखनौमधूनच खासदार राहिले आहेत. वाजपेयी यांनी 1998 ते 2004 या काळात देशाचे पंतप्रधान पद भूषविले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत त्यांना महत्त्वाचा वाटा होता. त्या केळी ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा।’ असे वक्तव्य वाजपेयींनी केले होते.
सर्वसमावेशकता मानणारा नेता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार होऊनही अटलजींचे राजकारण हे उदारमतवाद आणि समानतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्यांनी नेहमीच शांतता आणि निरपेक्षतेचा पुरस्कार केला. ते हिंदुत्ववादी होते. तरीही त्यांना देशातील विविधतेत एकात्मता हे सूत्र मान्य होते.
पाहा व्हिडीओ : कवितेतून पाकिस्तानला वाजपेयींनी दिला होता सज्जड दम
सत्तापालट करणारा नेता
अटलबिहारी यांनी काँग्रेसला, विशेषतः गांधी घराण्याच्या राजकारणाला जोरदार टक्कर दिली. काँग्रेसविरोधी पक्षांचे सरकार सत्तेत आणणे ही साधी बाब नव्हती. लोकशाही आणि संसदीय राजकारणाला कोणताही धक्का न लावता अटलबिहारी यांनी सत्तापालट केला. केंद्रात सत्ता मिळविण्याचे त्यांनी अनेकदा प्रयत्न केले, मात्र अनेकदा त्यांना अपयश आले. पुरेशा संख्याबळाअभावी त्यांना दोन वेळा पंतप्रधान पद सोडावे लागले. मात्र अखेर त्यांनी आघाडीच्या राजकारणाचा पुरस्कार केला आणि केंद्रात काँग्रेसेतर सरकार स्थापन केले. विशेष म्हणजे हे सरकार आघाडीचे सरकार असूनही त्यांनी ते पूर्ण काळ चालवले.
13 दिवसांचे सरकार
1996च्या निवडणुकीत भाजप 162 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोटय़ा पक्षांमुळे 1996ची लोकसभा त्रिशंकू राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांना इतर पक्षांकडून पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी 13 दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले.
अटलजींना दिग्गजांची श्रद्धांजली
राष्ट्रासाठी अविवाहित राहण्याचा निर्णय
आपले जीवन देशासाठी आणि खासकरून राजकीय सेवेसाठी वाहून घेण्याचे अटलजींनी ठरवले होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचे ठरवले, असेही सांगितले जाते.
























































