वडिलांचे बालपणी निधन, कंडक्टर आईने ‘त्याला’ टीम इंडियाचा स्टार बनवले

1146

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने शनिवारी बांगलादेशवर थरारक विजय मिळवत सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानचा डाव 106 धावांवर गडगडल्यानंतर बांगलादेशला 101 धावांत गुंडाळून हिंदुस्थानने 5 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. या अशक्य वाटणाऱ्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मुंबईच्या अथर्व अंकोलेकरने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला. हिंदुस्थानचा युवा स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्याची येथपर्यंतच्या प्रवासाची कथा रोमांचक आहे.

किताबी लढतीत सामनावीर ठरलेल्या अथर्वचे वडील विनोद अंकोलेकर हे बेस्टमध्ये कंडक्टर होते, मात्र वयाच्या नवव्या वर्षी अथर्वचे पितृछत्र हरपले. नऊ वर्षापूर्वी 2010 मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले. अथर्वची आई वैदेही अंकोलेकरही बेस्टमध्येच कंडक्टर आहेत, मात्र या सामान्य कुटुंबातील मुलाने युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत कमाल केली. हिंदुस्थानच्या 106 या अतिशय असुरक्षित धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना अथर्वने मोलाची भूमिका बजावली.

सचिनला केले होते आऊट

मुंबईत क्रिकेटची प्रॅक्टिस करणाऱ्या अंकोलेकर याची गेल्या महिन्यात टीम इंडियामध्ये आशिया चषकासाठी निवड झाली. यावेळी त्याच्या आईला अभिनंदनाचे तब्बल 40 हजार मेसेज आले होते. रिजवी कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणारा अथर्व नऊ वर्षापूर्वी चर्चेत आला होता. त्यावेळी त्याने एका सराव सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाद केले होते.

आशिया चषकात दमदार प्रदर्शन

आशिया चषकाच्या फायनलमध्ये अथर्वने दमदार प्रदर्शन केले. 106 धावांचा बचाव करताना अथर्वने आठ षटकांची गोलंदाजी केली. यात दोन षटकं मेडन टाकली. यात त्याने 28 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. या दमदार प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. या स्पर्धेत त्याने तब्बल 12 विकेट्स घेतल्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या