एटीएम मशीन हॅक करून, बँकेला लाखो रुपयांचा चुना

काही सेकंदांत एटीएम मशीन हॅक करून पाच ते सात मिनिटांत बनावट डेबिट कार्डच्या सहाय्याने पैसे काढून पसार होणारे हरयाणाचे दोन हायटेक चोरटे भांडुप पोलिसांनी गजाआड केले.

भांडुप पश्चिमेकडे अभ्युदय बँकेचे एटीएम सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये 17, 18, 19 सप्टेंबर रोजीच्या पडताळणीमध्ये दोन लाख 58 हजार रुपयांची तफावत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक नरेंद्र राणे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा नमूद तिन्ही दिवशी दोन व्यक्ती आल्याचे व त्यांची हालचाल संशयास्पद असल्याचे आढळून आले. त्यामुळे राणे यांनी त्यांची सहकारी शैलेजा आमले व अन्य सहकाऱयांसोबत एटीएम सेंटरवर सीसीटीव्हीतून पाळत ठेवली. 22 तारखेला त्या दोघांपैकी एकजण सेंटरमध्ये येऊन काहीतरी करीत असल्याचे निदर्शनास येताच राणे व त्यांच्या सहकाऱयांनी सेंटरचे शटर बंद करून त्याला ताब्यात घेऊन भांडुप पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव आरीफ शरफुद्दीन खान (38) असे सांगितले. तसेच त्याच्या साथीदाराचे नाव तारीफ उस्मान खान (25) असल्याचे सांगितले. तारीफ हा विमानाने दिल्लीला जाणार असल्याचे आरीफने सांगितल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक नितीन उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आनंद बागडे व पथकाने सहार विमानतळ गाठून तारीफला पकडले.

कुठल्याही शहरात जाऊन हातसफाई
दोघांकडे चौकशी केल्यावर ते हरयाणाचे असून एटीएम सेंटरमधील एनसीआर मशीन काही सेपंदांत ते हॅक करतात. मग बनावट डेबिट कार्डाच्या आधारे पैसे काढण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे समोर आले. पैसे मिळाल्यानंतर पसार व्हायचे अशी त्यांची मोड्स ऑपरेंडी आहे. हरयाणावरून मुंबईत आल्यावर ते भांडुपमध्ये आले. एका लॉजमध्ये राहून त्या एटीएम सेंटरमधून दोन लाख 58 हजारांची रोकड काढली. अशा प्रकारे त्याने बऱयाच ठिकाणी हातचलाखी केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.