
यूपी एटीएसचा वॉण्टेड आरोपी आणि ज्याच्यावर यूपी सरकारने एक लाखाचे बक्षीस घोषित केले होते त्या अब्दुल रज्जाक मेमन याला मुंबई एटीएसने मोठय़ा शिताफीने मुंब्य्रात पकडले. अब्दुल रज्जाकने हजारो बोगस सीम कार्डच्या माध्यमातून अनेक सायबर व आर्थिक गुन्हे केल्याचे यूपी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
अब्दुल रज्जाक अब्दुल नबी मेमन असे यूपी एटीएसच्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यूपी एटीएसच्या लखनऊ पोलीस ठाण्यात कलम 419,420,467,468,471,120 ब कलमांसह 66 डी. आय. टी. अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. यूपी एटीएस त्याचा कसून शोध घेत होते, पण अब्दुलचा थांगपत्ता त्यांना लागत नव्हता. त्यामुळे यूपी पोलिसांनी त्याला पकडणाऱ्यास एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. अखेर त्याला मुंबई एटीएसने पकडून दिले. अब्दुल हिंदुस्थान तसेच चीनमध्ये बसून सहकाऱ्यांच्या मदतीने सायबर तसेच आर्थिक गुन्हे करायचा. याप्रकरणात यूपी पोलिसांनी 167 जणांना अटक केली होती. पण अब्दुल सत्तार त्यांच्या हाती लागत नव्हता. प्री ऑक्टिव्हेटेड सीमच्या माध्यमातून तो ओटीपी मिळवायचा. मग त्याधारे ऑनलाइन खाते खोलून त्यात कार्डलेस ट्रान्झॅक्शॅन करून तो पैशांची अफरातफर करायचा असे यूपी एटिएसकडून सांगण्यात आले आहे. त्याने कपड्याच्या पार्सलमधून अनेक सीम कार्ड चीनमध्ये पाठवले होते, असेही सांगण्यात आले.





























































